हल्लीच दोन घटना अशा घडल्या, त्यातून गोव्याबद्दलची भलतीच प्रतिमा सर्वदूर पोचली. जर सरकारने वेळीच उपाययोजना आखली नाही तर गोव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास वेळ लागणार नाही आणि त्याचे गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागणार आहेत.
गोवा ही देवदेवतांची भूमी. या ठिकाणी विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे गोव्याची वेगळी ओळख जगभरात पोचली आहे. पण हल्लीच दोन घटना अशा घडल्या, त्यातून गोव्याबद्दलची भलतीच प्रतिमा सर्वदूर पोचली. जर सरकारने वेळीच उपाययोजना आखली नाही तर गोव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास वेळ लागणार नाही आणि त्याचे गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागणार आहेत.
गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या मोबाईलवरून एक अश्लील व्हीडिओ व्हॉट्स अप ग्रुपमध्ये शेअर झाला. या प्रकारामुळे संपूर्ण गोव्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आपला मोबाईल अज्ञात व्यक्तींने हॅक केल्याची तक्रार उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी पोलिसांच्या सायबर विभागाकडे नोंदविली. पण या तक्रारीचा तपास कुठपर्यंत पोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्री असलेल्या कवळेकर यांच्या मोबाईलातून व्हीडिओ शेअर झाल्याने वादळ उठले. हे वादळ शमले नाही तोच, बॉलिवूडमधील अभिनेत्री तथा मॉडेल पूनम पांडेचा काणकोणच्या चापोली धरणावर चित्रीत केलेला अश्लील व्हीडिओ व्हायरल झाला व पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले.
पूनम पांडेने स्वतःचा अश्लील व्हीडिओ स्वतःच शेअर केला होता अशी माहिती पुढे आली आहे. पूनम पांडेचे जेवढे ‘फालोअर’ आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हीडिओ जगभर पोचला. साहजिकच तो गोव्यात पोचण्यास वेळ लागला नाही. या व्हीडिओत पूनम पांडेचे पूर्ण नग्न व अर्धनग्न अवस्थेत चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या व्हीडिओमुळे गोव्याची प्रचंड बदनामी झाली आहे. भाजप सरकारच्या राजकीय विरोधकांनी त्वरित यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, सरकारकडून अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. त्यामुळे सरकार उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर व पूनम पांडेच्या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पहात असावे याबद्दल आत्ता सर्व सामान्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.
पूनम पांडे ही आपल्या ‘हॉट’ अदाकारीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. सप्टेंबर महिन्यात तिचा विवाह बॉयप्रेंड सॅम बॉम्बे यांच्याशी झाला होता. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर हे जोडपे ‘हनिमून’ साठी गोव्यात आले होते व काणकोणात उतरले होते. हनिमूनसाठी गोव्यात आली असताना, तिचे पती सॅम बॉम्बे यांनी त्यांना जबर मारहाण केली होती. त्यानंतर पूनम पांडेने काणकोण पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली. या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली त्यानंतर त्याची सुटका झाली.
पूनम पांडे व सॅम बॉम्बे हे पुन्हा मुंबईला गेल्यानंतर गोव्यात झालेले मारहाण प्रकरण त्यांनी आपापसात मिटविले होते. त्यानंतर पूनम पांडेनी दिलेली प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाणारी होती. आपले पती, आपल्या हॉट छायाचित्रांची विदेशात विक्री करून पैसे कमावत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर गोव्यात चापोली धरणावर चित्रीत केलेला अश्लील व्हीडिओ व्हायरल झाला व पूनम पांडेने जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, तिला एका अर्थाने पुष्ठीदेखील मिळाली.
गोव्यातील धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रात येतात असे असताना पूनम पांडेला चापोली धरणावर जाण्यास कुणी परवानगी दिली तसेच अश्लील छायाचित्रण कोणी केले असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे तर पूनम पांडेच्या विरोधात ‘बायलांचो एकवोट’ने दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांकडे तर काणकोण पोलीस स्थानकातदेखील तक्रार नोंद केलेली आहे. गोव्याची बदनामी करणाऱयांना माफ करू नये अशा मागणीने आत्ता जोर धरलेला आहे.
एक काळ होता जेव्हा ‘हिप्पी’ (विदेशी पर्यटक) गोव्यात आल्यावर समुद्र किनाऱयावर पूर्णपणे नग्न अवस्थेत ‘सनबाथ’ घेत असायचे. या हिप्पीमुळे गोव्याबद्दलची वेगळी प्रतिमा निर्माण होऊ लागली. साहजिकच सरकारला नग्नतेच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी लागली. तेव्हापासून गोव्यात नग्नतेवर बंद आली. पण, आत्ता पूनम पांडेच्या अश्लील व्हीडिओने गोव्याला पुन्हा चर्चेत आणले आहे. तर अन्य एका बॉलिवूड अभिनेत्याने गोव्यात नग्नावस्थेत समुद्र किनाऱयावर आपले प्रदर्शन मांडल्याची छायाचित्रे व्हायरल झालेली आहेत. त्यामुळे गोवा ही अश्लीलतेची भूमी म्हणून बघितले जाण्याची शक्यताही नाकारली जात नाही. गोव्याला फार मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. तिला अशा गोष्टीमुळे धक्का पोचणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी ही सरकारची. पण, खुद्द सरकारातील उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलमधून व्हॉटस् ऍप ग्रुपवर अश्लील व्हीडिओ व्हायरल होतो. त्या संदर्भात पोलीस तक्रार नोंद होते पण, सत्य परिस्थिती उघड होत नाही. उपमुख्यमंत्र्यांचा मोबाईल कुणी हॅक केला, त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. त्यात ‘व्हॉट्स ऍप’ हॅक केला जाऊ शकतो का असा सवालही अनेकांनी उपस्थित केलेला आहे तर विरोधी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर यांचा मोबाईल हॅक झाला, त्यावेळी ते कुठे होते व कोणासोबत होते असा सवाल उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडले होते. त्यामुळे सरकारने स्पष्टीकरण देणे आवश्यक होते. मात्र, आजपर्यंत सरकारने कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नसल्याने सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहे.
उद्या पूनम पांडेवर कारवाई होऊ शकते आणि तसे झाल्यास गोवा अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नाही असा संदेश सर्वांनाच मिळणार आहे. गोव्याची बदनामी करणारी कोणतीच गोष्ट सहन केली जाणार नाही असा संदेश देण्याची चांगली संधी सरकारला चालून आलेली आहे. पूनम पांडेवर कारवाई झाली तर उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवरून जो अश्लील व्हीडिओ व्हायरल झाला, त्यावर देखील कारवाई येथील जनतेला अपेक्षित आहे. त्यातून सरकारही पारदर्शक ठरणार आहे.
महेश कोनेकर








