कोरोनाच्या भीतीमुळे गोमंतकीय जनतेचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेले आहे. यंदाच्या श्रावणातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वैभवाला मुकलेल्या गोमंतकीय जनतेला कोरोना भीतीच्या तणावातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी तोडगा आवश्यक आहे.
कोविड-19 या महामारीमुळे श्रावणमास तसेच आगामी उत्सवांवर निराशेचे सावट पसरलेले आहे. 21 जुलैपासून श्रावणोत्सवाला प्रारंभ झाला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सांस्कृतिक वैभव लुप्त झाले आहे. कोरोनाबाधित व बळींची संख्या वाढतच असल्याने गोवा राज्य सध्या असुरक्षित बनले आहे. यामुळे गोमंतकीयांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचे गोव्यावरील संकट गडद होत असताना येथील अर्थव्यवस्था तसेच सांस्कृतिक सण-उत्सवांची मांदियाळी हरपलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोमंतकीय जरा जर्जर बनलेला आहे. राज्याची विस्कटलेली घडी कधी पूर्ववत होईल, याची चिंता गोमंतकियांना सतावत आहे.
गोव्यात पर्यटक येतात, त्यावेळी ते येथील समुद्रकिनाऱयांच्या प्रेमात पडतातच परंतु येथील मंदिरांनाही ते आवर्जून भेट देतात. गाव तेथे मंदिर याप्रमाणे संपूर्ण राज्यात तसेच गावा-गावामध्ये प्रमुख देवस्थानांबरोबरच प्रत्येक वाडय़ावर छोटी-छोटी मंदिरे आहेत. श्रावणमासात या ठिकाणीही विविध कार्यक्रम व्हायचे व प्रत्येक वाडय़ावर जणू काही भक्तिगंगाच अवतरत होती. नामवंत गायकांच्या भजन मैफली, कीर्तन तसेच अन्य धार्मिक विधींचीही रेलचेल होती परंतु या सांस्कृतिक वैभवाला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. काही देवस्थान समित्यांनी मंदिरे अनंत चतुर्दशीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर काही मंदिरे केवळ धार्मिक विधींपुरतीच व भाविकांना दर्शनासाठी खुली ठेवलेली आहेत. एकंदरीत श्रावण मासात गजबजणारा मंदिर परिसर सध्या सुनासुना वाटतो. श्रावणमासातील आनंद, चैतन्यदायी वातावरण द्विगुणित करण्यास इतर संस्थांबरोबरच कला अकादमी, कला व संस्कृती खाते, रवींद्र भवन यांचे योगदान असते. दरवर्षी कला अकादमीतर्फे भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती पुरुष, महिला, बालकलाकार गटात विविध केंद्रावर भजन स्पर्धा व्हायची. अंतिम फेरीवेळी कला अकादमीचे आवारदेखील रसिकवर्गाने ‘हाऊसफुल्ल’ व्हायचे. जणू काही येथे पंढरपूर अवतरल्याचा भास व्हायचा. यंदा या भजन परंपरेत कोरोनामुळे खंड पडलेला आहे. याचे दु:ख रसिकवर्गाबरोबरच कलाकारांनाही आहे. गोव्यातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या गडद संकटाखाली होत असलेल्या या गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारकडून अद्याप मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. या सूचनांकडे आता गोमंतकीय गणेशभक्तांचे लक्ष लागून आहे. काहींनी घरगुती गणेशोत्सव दीड दिवस तर काही जणांनी पाच दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केवळ दीड दिवसांचा उत्सव व फक्त धार्मिक विधीच करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश गणेश मंडळांनी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. एकंदरीत कोरोनाच्या उद्रेकामुळे गोमंतकीय जनता भयग्रस्त बनलेली आहे.
आज खऱया अर्थाने गोमंतकीय संस्कृतीचे जतन कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीकडून होत आहे. गोमंतकीय संस्कृती रक्षणार्थ ही तपोभूमी म्हणजे जणू दीपस्तंभरूपी आहे. कित्येक दशकांपासून येथे श्रावणमासाचे औचित्य साधून श्रावणी विधी केला जायचा. भारताच्या विविध प्रांतातील हजारो हिंदूधर्मियांच्या उपस्थितीत हा विधी व्हायचा परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र ही परंपरा खंडित झालेली आहे. प.पू. ब्रह्मानंदस्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीसुद्धा गोमंतकीय संस्कृतीच्या रक्षणार्थ बहुमूल्य योगदान देत आहेत. समाज निर्व्यसनी बनविण्याच्या दृष्टीनेही त्यांचे मोलाचे कार्य आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक उन्नती साधण्याचा प्रयत्न तपोभूमीतर्फे सातत्याने होत आहे. हे तपोभूमी गुरुपीठ गोवा राज्य तसेच भारत देशासाठीच नव्हे समस्त विश्वाला गौरवपूर्ण असेच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गुरुपीठावरील कार्यक्रमांना शिष्यगण व भाविकांना मुकावे लागणार आहे. आरोग्यविषयक नियमांचे पालन करून कोरोनाला आपल्यापासून दूर राखण्यासाठी श्रावणमासातही पूजा-अर्चा चालू राहण्यासाठी तपोभूमी पीठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने तपोभूमीने ऑनलाईन माध्यमातून पूजा पोर्टल सुरू करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे श्रावणोत्सव प्रत्यक्ष पुरोहितांद्वारे होऊ शकणार नसल्याने धर्मसेवेद्वारे ऑनलाईन पुरोहित सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. पुरोहित ऑनलाईन यजमानाला मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन माध्यमातून पौराहित्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन तपोभूमीतर्फे होत आहे. गणेश चतुर्थीप्रीत्यर्थ श्रीगणेश पूजाविधी वर्गही सुरू करण्यात आले आहेत. पुरोहितांअभावी गोमंतकीयांना चतुर्थी उत्सव साजरा करावा लागणार असल्यामुळे म्हार्दोळ येथील ‘कृतार्थ’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे खास ‘चवथीची गणेशपूजा’ याविषयी चित्रफीत तयार करून भाविकांसाठी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र देसाई यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरोहितांनीही धास्ती घेतल्याने कृतार्थ संस्थेतर्फे आधुनिक माध्यमांच्या मदतीने ऑनलाईन पूजाविधी मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमातून यजमानाला स्वत:च पौराहित्य करण्याची संधी लाभणार आहे.
यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वैभवाला मुकलेल्या गोमंतकीय जनतेला कोरोना भीतीच्या तणावातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी तोडगा आवश्यक आहे. आता केवळ सोशल मीडियावरच लोकांची भिस्त आहे. यामुळे सोशल मीडिया कोणती भूमिका बजावते, हे पहावे लागेल. गोमंतकीय सांस्कृतिक परंपरेचा ठेवा अबाधित राहण्याच्यादृष्टीने कोरोना महामारीचे संकट लवकरच दूर होणे अत्यावश्यक आहे. कोरोना महामारीची पीडा जाऊन लवकरात लवकर गोव्याचे हरवलेले सांस्कृतिक वैभव पुन्हा प्राप्त व्हावे अन्यथा येणारा काळ गोव्यातील कलाकार, रसिक व भाविकांना निश्चितच वेदनादायी, क्लेशदायक ठरेल, यात शंका
नाही.
राजेश परब








