प्रतिनिधी/ वास्को
हॉटेल्स खुले करण्यात आलेले आहेत. होलसेल बारही चालतात तर बार व्यवसाय बंद का असा प्रश्न दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दीन यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने हा प्रश्न केंद्र सरकारसमोर मांडावा अशी मागणी खासदार सार्दीन यांनी केली आहे.
दाबोळी विमानतळाच्या आवारात गोव्याच्या संस्कृतीवर आधारीत कला दालन खुले करण्यात आलेले असून या कलात्मक दालनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दीन यांच्या हस्ते बुधवारी दुपारी करण्यात आले. यावेळी सार्दीन यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्यातील बार व्यवसाय पुन्हा खुला करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या सर्व हॉटेल्स खुली झाली आहेत. दारू विक्रीचा घाऊक व्यवसायही चालू आहे. तर बार व्यवसाय बंद का ठेवण्यात आला आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बार व्यवसाय हा गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहे. गोवेकरांना दारू किती प्यावी याची चांगली माहिती आहे. ते मर्यादा ओलांडत नाहीत. बार खुले करण्याचा प्रश्न राज्य सरकारने केंद सरकारसमोर मांडायला हवा. आपण दिल्लीत असतो तर सरकारला हा प्रश्न विचारला असता. प्रारंभापासूनच आपण बार खुले करण्याची मागणी करीत आलेलो आहे असे ते म्हणाले.
गोव्याच्या संस्कृतीवर आधारीत कला दालनामुळे समाधानी
दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या आवारात गोव्याच्या संस्कृतीवर आधारीत कलात्मक कामाचे प्रदर्शन कला दालनाच्या माध्यमातून केल्याने खासदार फ्रांसिस सार्दीन यांनी समाधान व्यक्त केले. उशिरा का होईना हा एक चांगला उपक्रम असून गोव्यात दाखल होणाऱया देशी विदेशी प्रवाशांना विमानतळावर उतरताच गोव्याच्या संस्कृतीची ओळख या कलेमुळे होणार आहे. पर्यटकांना या प्रदर्शनामुळे गोव्याविषयी सुखद अनुभव मिळेल असे ते म्हणाले.
या उद्घाटनावेळी दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलीक व इतर अधिकारी अपस्थित होते.









