प्रतिनिधी/ मडगाव
पुणे-मुंबई हायवे एक्सप्रेसवरील बोरघाटात गुरुवारी सायंकाळी उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात मूळ सुकूर (पर्वरी) येथील व सध्या नायगाव (मुंबई) येथे राहात असलेल्या एका कुटुंबातील तीन सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला. सुकुर येथील लुईझा (35), तिचे पती ज्योकी (36) व त्यांचा 3 वर्षाचा मुलगा जाझियल यांचा अपघातानंतर कारला लागलेल्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार वसईजवळील नायगाव येथे हे कुटुंब राहात होते. त्यांच्या एका नातेवाईकाचा पुणे शहरात एक घरगुती समारंभ होता आणि त्या समारंभासाठी हे कुटूंब नायगावहून पुण्याला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर व तेथील पाहुणचार घेतल्यानंतर हे कुटुंब आपल्या कारमधून नायगावला परतत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील बोरघाट येथे ही दुर्घटना घडली.
ट्रेलरच्या धडकेमुळे झाला भीषण अपघात
अनेक चाके असलेला एक ट्रेलर ट्रक या सुपर एक्सप्रेसवरुन जात होता. या ट्रेलरपुढे एक ट्रक आणि ट्रकच्या पुढे दुर्देवी कार जात होती. मागून येणाऱया ट्रेलर चालकाचा वाहनावरील तोल गेला आणि ट्रेलर पुढे जात असलेल्या ट्रकला धडकला. अकस्मात बसलेल्या या धडकेमुळे ट्रकची धडक पुढे जात असलेल्या कारला बसली. तिन्ही वाहने हायवेवर भर वेगात होती. इतक्यात, ट्रकची कारला धडक बसली.
कारने पेट घेतल्याने तिघे होरपळलs
ज्योकी कार चालवत होता. काही कळायच्या आत कारने हायवेवरच अनेक पलटय़ा मारल्या आणि पेट्रोलवर चालणाऱया या कारने क्षणात पेट घेतला. क्षणात या कारला आगीच्या ज्वाळांनी घेरले आणि आत असलेल्या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प
रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली होती. तेथील एका पोलीस अधिकाऱयाने ही माहिती दिली. भर हायवे एक्सप्रेसवर हा अपघात झाल्याने दोन्ही बाजुनी हजारो वाहने अडखळून पडली. घटनास्थळी पोलीस आले व त्यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातातील तिन्ही वाहने बाजुला करुन रस्ता वाहतुकीस मोकळा करुन दिला. सुमारे चार तास हा महामार्ग यावेळी बंद राहिला.
ट्रेलर चालक रमेश निकम याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद केलेला असून या अपघातात तोही जखमी झलेला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. कामोठे येथील एमजीएम इस्पितळात त्याच्यावर उपचार चालू असल्याची माहिती खोपोली पोलिसांनी दिली.









