प्रतिनिधी /वाळपई
रविवारी रात्री गोव्यातून बेळगावकडे येणाऱया बुलेट मोटर सायकलला मोर्ले- पर्ये दरम्यान अपघात घडल्यामुळे बेळगावातील 23 वषीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
वाळपई पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री बेळगावातून गोव्याकडे येण्यासाठी दोन मित्र निघाले होते. मुरलीधर अशोक भिलारे (वय 23) राहणार वझे गल्ली -वडगाव बेळगाव हा मोटरसायकल चालवत होता तर विष्णू श्रीकांत तळेकर (वय 27) रामदेव गल्ली- वडगाव बेळगाव हा मागे बसला होता. मोर्ले पर्ये दरम्यानच्या एका धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व अपघात झाला. अपघातात मुरलीधर याच्या डोक्मयाला जबर मार बसला. त्याला साखळी सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विष्णू याला किरकोळ मार बसला आहे. त्यालाही साखळी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत मुरलीधर हा बेळगाव याठिकाणी व्यायामशाळा चालवित होता. दोघेही बेळगाव भागातून गोव्याकडे रविवारी येण्यासाठी निघाले होते. रात्री उशिरा पर्ये मोर्ले दरम्यानच्या एका धोकादायक वळणावर नियतीने त्यांचा घात केला व मुरलीधर याला मृत्यू आला.
याबाबतची माहिती मिळताच वाळपई पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरीश गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱयांनी पंचनामा केला.









