प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात गांजाच्या लागवडीला कायदा खात्याने मान्यता दिल्याने सरकारवर चौफेर टीका झाली. सरकारने सद्या हा प्रस्ताव पुढे न्यायचा नाही हे धोरण स्वीकारले आहेत. गांजाचा प्रश्न सासष्टीत सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात देखील उपस्थितीत झाला. त्यावेळी पक्षाचे सरचिटणीस आणि अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी भाजप सरकार कोणत्याच परिस्थितीत गांजा लागवडीला प्रोत्साहन देणार नसल्याचे ठासून सांगितले.
या कार्यकर्ता शिबिरात कोळसा वाहतूक व मोलेतील वीज प्रकल्प का महत्वाचे आहेत. याची माहिती देखील कार्यकर्त्यांना वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिली. सद्या सासष्टीत कोळसा वाहतूक व मोलेतील वीज प्रकल्पांना तीव्र विरोध आहे. एनजीओ व विरोधी पक्षांनी कोळसा वाहतूक व मोलेतील प्रकल्पावरून सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केलेला आहे. पण, भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाचे कशा पद्धतीने समर्थन करावे या सदंर्भात शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. त्यातूनच सरकार कोळसा वाहतूक व मोलेतील तीन प्रकल्प घेऊन सरकार पुढे जाणार असल्याचे आत्ता स्पष्ट झाले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना पक्षाची संघटना, पक्षाची उपलब्धी, सरकारच्या विविध योजना, माहिती तंत्रज्ञान या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. सरकारच्या योजना समाजातील सर्व सामान्य घटकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.
शनिवार व रविवार असे दोन दिवस सासष्टी तालुक्यातील सात मतदारसंघातील सुमारे 470 कार्यकर्त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रशिक्षण (मार्गदर्शन) दिले. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महामंत्री सतीश धोंड, वीजमंत्री निलेश काब्राल, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक, गोविंद पर्वतकर, गुरूप्रसाद पावसकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व नवीन पै रायकर यांचा समावेश होता.
नावेली मतदारसंघासाठी पटीदार भवनात घेण्यात आलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात नावेली व वेळळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यात नावेली मतदारसंघातील सुमारे 185 कार्यकर्ते तर वेळळीतील सुमारे 10 कार्यकर्ते उपस्थितीत होते. मडगाव व बाणावली मतदारसंघासाठी हॉटेल व्हिवामध्ये शिबीर घेण्यात आले. त्यात 125 कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर फातोर्डा, नुवे व कुडतरी मतदारसंघासाठी मठसंकुल येथे शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी 150 कार्यकर्ते सहभागी झाले होते.









