माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या प्रयत्नांना यश : तहसीलदारांचे आश्वासन
वार्ताहर / दोडामार्ग:
आज शनिवार व उद्या रविवारी राज्य व सिंधुदुर्गात होणाऱया लॉकडाऊनमध्ये दोडामार्गातून गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱयांना येथील प्रशासनाकडून सूट देण्यात आली आहे. नोकरीसाठी गोव्यात ये-जा करणाऱयांनी प्रशासनाला संबधित कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यांना ये-जा करणे सुलभ होईल, असे तहसीलदार अरुण खानोलकर यांनी आज स्पष्ट केले. दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी गोव्यात नोकरीनिमित्त ये-जा करणाऱयांच्यावतीने तहसीलदारांचे नानचे यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी खानोलकर यांनी ही ग्वाही दिली.
राज्यात तसेच सिंधुदुर्गात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आज शनिवारी व उद्या रविवारी दोन दिवसांची विकेंड लॉकडाऊन जाहीर झाले आहे. जिह्यातील इतर ठिकाणासोबत दोडामार्गतही प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनातर्फे तसेच नगरपंचायततर्फे शहरातील व्यापारी, नागरिक यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र दोडामार्ग शहर तसेच तालुक्यातून गोव्यात शासकीय / खासगी नोकरीनिमित्त ये-जा करणाऱयांचा प्रश्न उभा राहिला होता. या सर्वांनी आज माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांची भेट घेतली व त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली.
नानचे यांनी तहसीलदार अरुण खानोलकर यांची भेट घेतली व या संदर्भात सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र व सिंधुदुर्गात जरी लॉकडाऊन असले तरी गोवा सरकारने मात्र लॉकडाऊन केलेले नाही. तसेच आपल्या सीमा देखील बंद केलेल्या नाहीत. तेथील शासकीय कार्यालये व खासगी कंपन्या चालू राहणार आहेत. त्यामुळे दोडामार्गातील अनेकजण आपआपल्या कामाच्या ठिकाणी जाणार असून त्यांना आपल्या प्रशासनाकडून कोणताही त्रास होता नये, असे नानचे यांनी स्पष्ट केले. त्यावेळी दोडामार्गमधून या दोन दिवसात गोव्यात हे नोकरीला जाणार आहेत त्यांनी आपल्या नोकरी अस्थापनेतील ओळखपत्र, कंपनीचे पत्र सोबत ठेवावे व सीमेवर तैनात संबधित पोलीस व अन्य कर्मचाऱयांना दाखवावे या संदर्भात सीमेवरील कर्मचाऱयांना तशा सूचना देण्यात आल्याचे तहसीलदार खानोलकर यांनी सांगितले.









