प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात आध्यात्मिक आणि ग्राम पर्यटनाला चालना द्यावी तसेच आंतरराष्ट्रीय आणि देशी पर्यटकांना विविध धार्मिक स्थळे दाखवावी यासाठी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सूचना केल्याची माहिती राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी दिली. राज्यपालांनी शुक्रवारी वेर्णा श्री महालसा देवस्थान, वेर्णा औद्योगिक वसाहत, वेर्णा चर्च आणि लोटली येथील ‘एन्सेस्ट्रल गोवा’ला भेट दिली. यावेळी राज्यपाल प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल श्रीधरन पिल्लई पुढे म्हणाले की, गोवा ही मानवाला देवाने दिलेली देणगी आहे, जिथे लोक एकमेकांसोबत सौहार्दपणे राहतात. ‘मंदिरात सर्वशक्तिमान देवासमोर सर्वजण समान असतात आणि म्हणूनच ब्राह्मण पुजारी आणि आदिवासी पुजारी सौहार्दपूर्ण संबंध ठेवतात आणि एकत्र पूजा करतात. ही एक अपवादात्मक गोष्ट आह.s जे मी येथे पाहिली आहे आणि मला माझ्या पुस्तकात हे अधोरेखित करायचे आहे.
ट्रस्ट आणि समित्यांनी मंदिराची सुंदर देखभाल केली आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने पर्यटकही आकर्षित होऊ शकतात. मी राज्यपाल या नात्याने मुख्यमंत्र्यांना आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि विविध धार्मिक स्थळे, विशेषतः खेडय़ा गावांतील धार्मिक स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यास सांगितले आहे.
गोवावासीयांना राज्यात उद्योग विकसित करायचे आहेत याचा मला आनंद आहे. आपण शेती-बागायती, मच्छीमार भागांना भेटी दिल्या आहेत आणि आज आपण औद्योगिक क्षेत्रांना भेट देत आहे. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी जाहीर केलेल्या निर्णयांचे, प्रकल्पांचे आणि धोरणांचे स्वागत करतो, कारण गोव्याला उद्योग विकसित करण्यात तितकाच रस आहे.
राज्यपाल पिल्लई म्हणाले की, त्यांनी गाव दर्शन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुमारे 150 गावांना भेटी दिल्या आणि परिसरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
आपण एक पुस्तक लिहिणार आणि मला भारतभर हे अधोरेखित करायचे आहे की ‘सनातन धर्म’ जातीयवाद आणि अस्पृश्यतेमुळे प्रभावित झाला आहे ज्याला आता गुन्हा घोषित करण्यात आला आहे. आपल्याला काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात नऊ महिने वैयक्तिक अनुभव आला. देवतेच्या मूर्तीला स्पर्श करून ब्राह्मण पुजारी पूजा करतात आणि इतर तीन महिने तीच पूजा आदिवासी पुजारी करतात आणि हे भारतभर प्रसिद्ध व्हायला पाहिजे.
एकप्रकारे, आपला अनुभव असा आहे की, गोव्याची गावे इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा सुंदर आहेत आणि मनाने चांगले लोक आहेत आणि या गावांमध्ये विकासाची शक्मयता आहे. गोव्याला गाव आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भरपूर वाव आहे.









