गोव्याने पोलिसांसह सर्व कर्मचाऱयांना हटविले
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सर्व सीमा खुल्या झाल्या असून तेथून आंतरराज्य वाहतूकही चालू करण्यात आली आहे. तेथे घालण्यात आलेल्या गेटस् तसेच तैनात करण्यात आलेले पोलीस, आरोग्य व इतर खात्याचे कर्मचारी हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सीमेवरून गोव्यात ये-जा करण्यासाठी आता लॉकडाऊनचे निर्बंध राहिलेले नाहीत, मात्र महाराष्ट्रने चेकनाके खुले न करण्याचा आडमुठेपणा केल्याने सिंधुदुर्गवासियांत संताप व्यक्त होत आहे. गोवा सरकारने अनलॉक 4.0 मधील केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोव्याच्या सीमा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे मुक्त केल्या आहेत.
मोले, पोळे, दोडामार्ग, पत्रादेवी, न्हयबाग, किरणपाणी, केरी व चोर्ला या गोव्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सीमा गेल्या पाच महिन्याप्ंाासून कोविड 19 मुळे बंद करण्यात आल्या होत्या. गोव्यात प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले होते. ते सर्व आता काल 1 सप्टेंबरपासून उठवण्यात आले असून सर्व प्रकारची वाहतूक तेथून सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालकाना दिलासा मिळाला असला तरी कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 31 ऑगस्ट रोजी 1 सप्टेंबरपासून गोव्याच्या सीमा खुल्या करण्याचे जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रात्री 12 वाजल्यापासून कर्नाटक, महाराष्ट्र येथून खासगी वाहने येण्यास सुरुवात झाली.
पोळे माजाळी चेकनाक्यावर आनंदोत्सव
पोळे-माजाळी चेकनाका मंगळवारी खुला झाला आहे. कारवारच्या कर्नाटक वेदिका संघटना, विद्यार्थी संघटना, कुमठा, अंकोला येथील रिक्षा, टॅक्सी युनियन यांनी पोळे चेकनाका खुला करण्याची मागणी करत 29 ऑगस्ट रोजी धरणे धरले होते आणि गोवा सरकारने 1 सप्टेंबरपासून चेकनाका खुला केला नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. गोवा सरकारने आपला शब्द पाळला, असे सांगून या आंदोलनाचे नेते रघू नाईक आणि कारवारच्या अन्य नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करताना माजाळी व पोळे चेकनाक्यांवरील कर्मचाऱयांना मिठाई वाटली.
मोले चेकनाक्यावर दिसली मोजकी वाहने
गोवा – कर्नाटकच्या दरम्यानची महत्वाची मोले सीमाही खुली झाल्यानंतर चेक नाक्यावर वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. गेल्या दीड वर्षापासून अनमोड ते पुढेपर्यंत महामार्ग बांधण्याचे काम सुरु असल्याने या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळेही नाकाबंदी होतीच. मंगळवारी सीमा खुली झाली असली तरी बांधकाम सुरु असल्याने मोजकीच वाहने दिसून आली. आंतरराज्य बस वाहतुक सुरु करण्यात आली आहे. मात्र महामार्ग बांधकामामुळे घाट वाहतूक बंद असल्याने एकही प्रवासी बस वाहतूक करू शकलेली नाही. तुरळक लहान खासगी वाहने सध्या या मार्गावरून ये-जा करीत आहेत.
गोवा-बेळगाव सीमाही झाली खुली
गोवा-कर्नाटक दरम्याची अत्यंत महत्वाची सीमा असलेल्या केरी-चोर्ला सीमेवरील दोन्ही बाजूंचे चेकनाके खुले करण्यात आले आहेत. वाहतुकीला बिनदिक्कतपणे सुरुवात करण्यात आलेली आहे. यामुळे या भागातील दुकानदार, अन्य व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला. नाकाबंदी हटविण्यात आल्यामुळे या भागातील बाजारपेठेला पुन्हा बळकटी प्राप्त होण्याची आशा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे सिंधुदुर्गात तीव्र संताप
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गोव्याने मंगळवारी आपले सर्व चेकनाके खुले केले असले तरी महाराष्ट्र सरकारने आडमुठे धोरण स्वीकारत आपल्या बाजूचे चेकनाके कायम ठेवले असून ये-जा करण्यावर निर्बंध सुरुच ठेवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या आडमुठय़ा धोरणाबद्दल सिंधुदुर्गवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुपारपर्यंत सर्व चेकनाके बंदच ठेवले. नंतर सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केवळ नोकरी, व्यवसायानिमित रोज ये-जा करणाऱयानाच सीमेवर परवानगी दिली जाईल, असा आदेश जारी केला. अन्य कोणालाही महाराष्ट्रात जायचे असेल, त्यांना तेथे जाऊन 14 दिवस क्वॉरंटाईन होण्याची अट कायम ठेवली आहे.
सातार्डा चेकनाक्यावर लोकांकडून नासधूस
महाराष्ट्रच्या सरकारी यंत्रणेने त्यांच्या बाजूचे चेकनाके खुले न केल्याने तणाव निर्माण झाला. नईबाग-सातार्डा सीमेवरील महाराष्ट्रचा चेकनाका खुला न केल्याने सातार्डावासियांनी एकत्र जमून आंदोलन केले. यावेळी चेकनाक्याची नासधूस केल्याचा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्राच्या निर्णयाने सिंधुदुर्गवासियांना त्रास
पञादेवी-बांदा सीमेवरील गोव्याच्या बाजूचा चेकनाका पहाटेच खुला करण्यात आला होता, मात्र महाराष्ट्रने आपल्या बाजूचा बांदा चेकनाका खुला केला नाही. किरणपाणी-आरोंदा सीमेवरील गोव्याचा चेकनाका खुला करण्यात आला, मात्र तेथेही महाराष्ट्रने आरोंदा चेकनाका खुला केला नसल्याने सिंधुदुर्गातील नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त करीत महाराष्ट्र सरकारच्या कृतीचा निषेध केला. तेरेखोल-रेडी सीमेवरही महाष्ट्रने आपला चेकनाका खुला केलेला नाही. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्गवासियांना खूप मनस्तपाप सहन करावा लागत आहे.
बार अँड रेस्टॉरंटही सुरू
गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेले गोवा राज्यातील बार, रेस्टॉरंट देखील कालपासून सुरू झाले असून ग्राहकांनी तेथे हजेरी लावणे चालू केले आहे. बार रेस्टॉरंट खुले झाल्यामुळे त्यांच्या मालक, चालकांनी आनंद व्यक्त केला असून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.









