वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फुकेतमध्ये झालेल्या थायलंड खुल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने 10 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताच्या गोविंद सहानी, अनंता चोपडे आणि सुमीत यांनी सुवर्णपदके मिळविली.
पुरूषांच्या 48 किलो वजनगटातील अंतिम लढतीत भारताच्या गोविंद सहानीने थायलंडच्या टी. नेटहेफोनचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पुरूषांच्या 54 किलो वजन गटात भारताच्या अनंता चोपडेने थायलंडच्या आर.सेंगसेंवांगचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले.
पुरूषांच्या 75 किलो वजनगटात भारताच्या सुमीतने थायलंडच्या वाय,.पिटापेटचा 5-0 असा पराभव करत आपल्या देशाला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरूषांच्या 52 किलो वजनगटात भारताच्या अमीत पांगलने तसेच 60 किलो गटात वरिंदर सिंगने आणि 81 किलो वजनगटात आशिषकुमारने त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात 48 किलो वजनगटात मोनिकाने रौप्यपदक पटकाविले. भारताच्या या चारही मुष्टीयोद्धय़ांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या विभागात मनिषाने 57 किलो वजनगटात, पुजाने 69 किलो वजनगटात आणि भाग्यवती कचेरीने 75 किलो वजनगटात कास्यपदके मिळविली. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कास्यपदके जिंकली. सुवर्णपदक विजेत्याला 2000 डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 1000 डालर्स आणि कास्यपदक विजेत्याला 500 डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.









