म्हापशात भाजपा राज्य कार्यकारिणीची बैठक पार
प्रतिनिधी/ म्हापसा
गोव्यातील भारतीय जनता पार्टी सरकारने नुकतीच सक्षम कारभाराची साडेतीन वर्ष पूर्ण केली आहे. केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वाखाली समर्थ सरकाच्या सशक्त पाठिंब्याच्या आधारे गोव्यातील सरकार प्रगती व संपन्नेच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राज्यातील तळागळातील शेवटय़ा माणसांच्या भल्यासाठी अंत्योदय विचारधारेच्या मार्गाने हे सराकर वाटचाल करीत आहे. पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम प्रतीची पायाभूत साधन सुविधा निर्माण करण्यापासून ते समाजकल्याणाच्या विविध योजनांद्वारे समाजाच्या सर्व स्तरावरील नागरिकांपर्यंत सर्वांचा विकास साधणे, शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता सुधारणे व त्याद्वारे राज्यात आर्थिक गुंतवणूक आकर्षित करणे अशा सर्वकष प्रयत्नांनी गोवा ही सवर्णभूमी बनविण्यासाठी हे सरकार कार्यरत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात या महामारीची लागण असली तरी सरकारने अथक प्रयत्नाने मा. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या आवाहनाप्रमाणे राज्यात जनता करफ्यूचे यशस्वी पालन केले व त्या काळात धान्यसामुग्री, औषधोपचार व निवारा यांची परराज्यातील श्रमिकांसाठी पुरेशी व्यवस्था केली. त्यांच्या घरवापसीसाठी श्रमिक एक्सप्रेस गाडय़ांची व्यवस्था केली. बाहेरील राज्यात व देशात अडकलेल्या गोव्याच्या नागरिकांना व खलाशांना मायभूमीत परत आणले. वंदे भारत योजनेंतर्गत अडकलेल्या नागरिकांना परदेशात सुखरुप पोचविणे तसेच औषधांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करुण देणे अशा विविध मार्गांनी या संकटाचा यशस्वी मुकाबला या सरकारने केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
याच काळात आपल्या सरकारने राज्यभर सर्वदूर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या. दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ, ई.एस.आय. इस्पितळ ही कोविड उपचार केंद्रे जाहीर केली व छोटी केंद्रे राज्यभर उपलब्ध करून दिली. अशी आरोग्य व्यवस्था वेळेत तयार करून व परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण व लक्ष ठेवून असल्याने परिस्थितीत हळूहळू पण निश्चित सुधारणा होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या अडचणींच्या काळात महत्त्वाच्या परिक्षकांच्या काळात विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिले.
याच काळात गृहआधार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांना पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले व जनतेस दिसाला दिला. दूरसंचार साधनसुविधा पॉलिसी गोव्यात लागू केल्याने राज्यात चांगल्या प्रतीची इंटरनेट सेवा मिळू लागेल. सार्वजनिक बांधकाम खात्यातील विविध कंत्राटदारांकडे तुटपुंज्या रोजगारावर काम करणाऱया 1185 कंत्राटी हंगामी कामगारांना कर्मचारी पुरवठा संस्थेत सामील करून घेण्याची महत्त्वाची कल्याणकारी योजना याच सरकारची. या कामगारांना आता सन्मानाने पुरेसे वेतन मिळू लागेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आपले कंद्रातले व राज्यातले सरकार शेतकऱयांना जास्तीत जास्त सुविधा देते व त्यांची प्रगती होणे यासाठी प्रयत्नरत आहेत. हेच लक्ष्य पुढे ठेवून आपल्या सरकारने संजीवनी सहकारी साखर कारखाना हा शेतकी खात्यांतर्गत आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकार्चया कृषी क्षेत्राशी संबंधित विविध लाभदायी योजनांचा फायदा उस उत्पादक शेतकऱयांना घेता येईल. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
काँग्रेस पक्षाचा निषेध
हे सर्व होत असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्ष यांचा जनसंपर्क पूर्ण तुटला आहे व ते भारतीय जनता पक्ष व सरकारची प्रतीमा मलीन करण्याचा चंग बांधून प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विपर्यास करून खोटे नाटे आरोप करीत आहेत. यातून त्यांचे जन विरोधी व देशहित विरोधी वागणे हे स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांनी सीसीए विरोधी देशभरात वातावरण निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न, पीएम केअर फंड विरोधात उठविलेली खोटी मोहीम, सरकारने परीक्षा घेऊ नये म्हणून घातलेला गोंधळ यामुळे त्यांचा खरा जन विरोध चेहर जनतेसमोर आला आहे. प्रत्येक पावलावर प्रत्येक निर्णयाला आंधळा विरोध व ओरड हा नवीन घातक पायंडा ते पाडत आहेत. ही राज्य कार्यकारिणी काँग्रेस पक्षाच्या या प्रवृत्तीचा निषेध करीत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोविड महामारी विरोधी युद्धात वावरणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व इतर सरकारी कर्मचारी यांचे त्यांच्या अथक परिश्रमांसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकारिणीसह अभिनंदन केले.









