पाच वर्षांच्या कालावधीतील अखेरचे अधिवेशन, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
गोवा विधानसभेचे दोन दिवशीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या पाच वर्षांच्या कालावधीतील हे अखेरचे अधिवेशन असून यामध्ये 77 तारांकीत प्रश्न चर्चेला आलेले आहेत. दोन दिवसांचे असले तरी विरोधक अधिक आक्रमक बनून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या अधिवेशनात भूमिपुत्र विधेयक घेतले जाणार नाही. गेल्या अधिवेशनात अत्यंत घाईघाईने संमत केलेल्या या विधेयकावरून संपूर्ण गोव्यात तीव्र संताप उसळला होता. जनतेचा रोष लक्षात घेऊन तिसऱयाच दिवशी हे विधेयक स्थगित ठेवले व जनतेकडून सूचना मागवून घेऊ असे जाहीर केले होते. मात्र आता भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सदर विधेयकाला आग्रह धरू नका व ते रद्द करा, अशी सूचना केली होती. त्यानुसार आता मुख्यमंत्री डॉ. सावंत हे या अधिवेशनात विधेयक आणणार नाहीत. या अधिवेशनात प्रश्नोत्तर तास, शून्य प्रहर व सरकारची तीन विधेयके चर्चेस येणार आहेत. सभागृहाकडे यावेळी जादा काम राहिलेले नाही.
विधानसभेचे संख्याबळ आता लुईझिन फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर 39 झाले आहे. विरोधी पक्षाचे संख्याबळ 1 ने कमी झालेले आहे. तरीदेखील विजय सरदेसाई, रोहन खंवटे आणि सुदिन ढवळीकर हे तिन्ही नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. उद्या सोमवारी सकाळी 11.30 वा. अधिवेशनास प्रारंभ होणार आहे.









