काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची हाक : सांताक्रूझ येथे जाहीर सभा,पणजीत घरोघरी प्रचार
प्रतिनिधी /पणजी
पुढील पाच वर्षे पुन्हा भाजपसाठी दिली तर गोवा नावालाही शिल्लक राहाणार नाही म्हणून गोवा राज्य वाचविण्यासाठी भाजपला टाळा आणि काँग्रेसला निवडून विजयी करा, अशी हाक काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी दिली आहे. काँगेस उमेदवार रुडॉल्फ फर्नांडिस त्यावेळी उपस्थित होते.
सांताक्रूझ येथील जाहीर सभेत त्यांनी भाजपावर निशाणा साधून जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची असून ती कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाची नाही. गोवा हा गोमंतकीय जनतेच्या हातात राहिला पाहिजे म्हणून गोवा टिकवण्यासाठी मतदान करा. गोव्याचे हित जपा. गोव्यावर गोमंतकीयांचीच सत्ता असली व आली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
गोवा बेकारी देशात दुसऱया क्रमांकावर
गोव्यात सर्व काही आहे परंतु त्याची जोपासना होत नाही आणि त्यात बेकारांना नोकऱया मिळत नाहीत ही मोठी खंत आहे. गोवा राज्य बेकारीत संपूर्ण देशात दुसऱया क्रमांकावर आहे. त्याला भाजप कारणीभूत असल्याचा ठपका प्रियांका गांधी यांनी ठेवला आहे. गोव्यातील फुटीरांचे राजकारण संपवा व सकारात्मक राजकारण करा, असा सल्ला त्यांनी दिला. अनेक धोरणे गोमंतकीय जनतेवर लादण्यात येत असून त्यासाठी कोणालाच विश्वासात घेतले जात नाही. काँग्रेस पक्ष असे करणार नाही व सर्वांना विश्वासात घेऊन मागणीनुसार धोरणे आखण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
पणजीत घरोघरी प्रचार
राजधानी पणजीतील काही भागात प्रियांका गांधी यांनी सायंकाळी उशिरा केलेल्या घरोघरी प्रचारात काँग्रेस कार्यकर्ते, जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यांना पाहण्यासाठी तसेच मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सांताक्रूझ – कुंभारजुवे येथील त्यांच्या जाहीर सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या आगमनामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पणजीत प्रचार केल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा दिल्लीकडे प्रयाण केले.









