8 लाख 50 हजाराच्या ऐवजासह एकजण ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
गोव्याहून बेळगावकडे बलेनो कारमधून दारू वाहतूक करत असताना कॅम्प पोलिसांनी कार पकडली. त्यामधील विविध कंपन्यांच्या 182 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी एकाला अटक करून कार जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली.
अनिल नारायण धामणे (वय 25, रा. ढोर गल्ली-बेळगाव) हा गोव्याहून दारू घेऊन येत असल्याची माहिती कॅम्प पोलिसांना मिळाली. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी सापळा रचून गणेशपूर रोडवर अनिलच्या कारची झडती घेतली. त्यावेळी त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध बाटल्या आढळल्या. पोलिसांनी कारसह मुद्देमाल जप्त केला. अनिलवर गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेली दारू 50 हजार रुपये किमतीची असून 8 लाख रुपयांची कारही ताब्यात घेण्यात आली आहे. कॅम्प पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









