दिल्लीतून मान्यता मिळणे कठीण?
प्रतिनिधी /मडगाव
गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्ष यांच्या दरम्यान युती होईल की नाही या बद्दल सांशकता निर्माण झाली आहे. शनिवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती संदर्भात चर्चा केली असली तरी त्यात युतीवर शिक्कामोर्तब करणे शक्य झालेले नाही. गोवा फॉरवर्डशी युती करण्यास काँग्रेस पक्षाचे गोवा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम तसेच राहुल गांधी हे राजी नसल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यात प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी दिल्लीत धावती भेट दिल्याने गोवा फॉरवर्डला युतीचे दरवाजे बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोवा फॉरवर्डशी युती व्हावी अशी इच्छा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच नव्याने नियुक्त केलेले कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी व्यक्त केली होती व त्या दृष्टीकोनातून प्रयत्न चालविले होते. तर दुसऱया बाजूने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच अन्य काही जणांचा गोवा फॉरवर्डकडे युती करण्यास तीव्र विरोध आहे. त्याचबरोबर फातोर्डा गट काँग्रेसचा देखील तीव्र विरोध आहे.
दिनेश गुंडू राव यांची गोवा फॉरवर्डशी बोलणी
काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी शनिवारी गोव्यात येऊन गोवा फॉरवर्डकडे युतीची बोलणी सुरू केली. यावेळी फातोर्डा, सालीगांव, शिवोली, काणकोण, पेडणे व थिवी हे मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर काँग्रेसच्या एका नेत्याने सांतआंद्रे देखील गोवा फॉरवर्डला सोडावा असा मुद्दा मांडला असता धुसफूस सुरू झाली आणि कोणताच अंतिम निर्णय घेणे शक्य झाले नाही.
या युतीच्या बैठकीचा सविस्तर तपशील दिल्लीला पोचल्यानतंर त्याला कलाटणी मिळाली. मुळात युतीचा निर्णय हा दिल्लीतून होईल असे सांगितले जात असतानाच दिनेश गुंडू राव अचानक गोव्यात कसे काय पोचले, त्यांना कोणी बोलावले हा मुद्दा देखील उपस्थित झाला. काँग्रेस पक्षाचे गोवा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम व राहुल गांधी यांना देखील या घडामोडीची कल्पना नव्हती. युतीचा निर्णय हा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतला जाणार असल्याचे ते वारंवार सांगत आले होते. मात्र, अचानक युतीची परस्पर बोलणी सुरू झाल्याने तेही आर्श्चय चकीत झाले.
दुसऱया बाजूने गोवा फॉरवर्डने तृणमूल काँग्रेसकडे युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात गोवा फॉरवर्ड तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन करावा असा प्रस्ताव दिल्याने गोवा फॉरवर्डसमोर अडचण निर्माण झाली होती. गोवा फॉरवर्ड पक्ष तृणमूलमध्ये विलीन करण्यास गोवा फॉरवर्डच्या काही पदाधिकाऱयांचे एकमत नव्हते. दुसऱया बाजूने काँग्रेसने युतीची बोलणी करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु त्याला दिल्लीवरून मान्यता नव्हती. त्यामुळे सध्या गोवा फॉरवर्डला ‘ना धड काँग्रेस, ना धड तृणमूल’ अशी अवस्था झालेली आहे. गोवा फॉरवर्ड आत्ता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
गोयंकारपणाचे उद्दिष्ट ठेवूनच निर्णय घेणार : विजय सरदेसाई
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काँग्रेसबरोबर युतीसंदर्भातील बोलणी यापूर्वीच निलंबित केलेली आहे. तथापि, आपले काँग्रेस पक्षातील नेत्यांशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. योग्यवेळी योग्य तो निर्णय घेण्यास आपण समर्थ आहोत, असे ते म्हणाले. आपल्याशी अनेक राजकीय नेते संपर्क ठेवून आहेत, परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही गोव्याची अस्मिता, गोव्याची परंपरा आणि गोयंकारपण जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत तत्वांशी तडजोड करणार नाही. त्यामुळे ज्या राष्ट्रीय पक्षांकडून प्रस्ताव येतात त्या प्रत्येक प्रस्तावावर आम्ही सखोलपणे अभ्यास करीत आहोत. तथापि, कोणताही निर्णय घेताना अगोदर गोंयकारपण हे उद्दीष्ट समोर ठेवणार असे ते म्हणाले. त्याचबरोबर पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहील अशी घोषणाही त्यांनी केली.








