दुध 4 रूपये प्रति लिटरने महागणार, हायफेट 62 रूपये प्रतिलिटर : अर्ध्या लिटर दुध पिशवी रू. 2 ने महागणार, हायफॅट रू 5 ,…..शेवटी ठरली एकदा गोवा डेअरीची आमसभा
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीतर्फे येत्या 15 एप्रिलपासून ग्राहकांसाठी प्रति लिटर रू. 4 दुधदरवाढीचे संकेत नुकत्याच झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत दिले आहेत. वाढती महंगाई, वाहतूक दरात वाढ, कच्चा मालात झालेल्या दरवाढीमूळे गोवा डेअरीला प्रचंड नुकसानी सोसावी लागत असल्यामुळे ही दरवाढ करण्यात येत असल्याची माहिती डेअरीचे ओएसडी म्हणून कार्यरत असलेले व्यवस्थापकीय संचालक काशी नाईक यांनी दिली.
या दरवाढीतून होणाऱया नफ्यातून दुध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रूपयांनी वाढ करण्यात येणार आहे. याचा फायदा सुमारे 178 दुध सोसायटीच्या माध्यमातून जोडलेल्या राज्यातील सुमारे साडे चार हजार दुध उत्पादकांना मिळणार असून गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाची भेट ठरणार आहे. सद्या गोवा डेअरी राज्यातील शेतकऱयाकडून 52 हजार लिटर दुध संकलन करीत असून बाजारात ग्राहकांकडून असलेली 64 हजार लिटर दुधाची मागणी पुरविण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून 12 हजार लिटर दिवसाकाठी मागविण्यात येत आहे. दुध दरवाढीतून डेअरीला सुमारे 1 लाख 20 हजार रूपये नफा दिवसाकाठी होणार असल्याची माहिती काशी नाईक यांनी दिली. सहकार निबंधकाकडे याप्रकरणी फाईल मंजूरीसाठी पाठविण्यात आलेली आहे.
….शेवटी ठरली एकदाची गोवा डेअरीची आमसभा
नेहमी वादळी ठरणारी गोवा डेअरीची आमसभा येत्या 30 एप्रिल पुर्वी घेणे अनिवार्य असल्यामुळे शेवटी 27 एप्रिल रोजी कुर्टी येथील सहकार भवनात दुध सोसायटीच्या सभासदांची आमसभा घेण्यासाठी त्रिसदस्यीय समितीने मुहुर्त काढलेला आहे. मागील कार्यकाळात दुध उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणारे दुर्गेश शिरोडकर यांनी गोवा डेअरी नफ्यात आणून शेतकऱयासाठी भरघोस रू. दीड कोटी दरफलकाचे वाटप करण्यात आले होते. यंदा डेअरी भयंकर तोटयात असल्यामुळे दुध उत्पादकांना प्रोत्साहीत करण्यासाठी रू. 2 प्रति लिटर वाढवून नामी शक्कल चालविलेली असून तोटय़ात असलेल्या पशुखाद्य प्रकल्पालाही उभारी मिळणार आहे.
गोवा डेअरीच्या रू. 25 असलेल्या अर्ध्या लिटरसाठी मोजावे लागणार रू. 27
गोवा डेअरीतर्फे चार घटकातून दुध विक्री सद्यस्थितीत होत आहे. हाय फॅट फुल क्रिम दुध सद्या 57 रूपये प्रति लिटर असा असून तो वाढवून नव्या दरानुसार 62 रूपये प्रति लिटर असा दर ग्राहकांना सोसावा लागणार आहे. अर्धा लिटरमध्ये उपलब्ध असलेली शक्ती स्टेंन्डर्ड मिल्क रू. 25 वरून 27 रूपये, दिवा गायीचे दुध रू. 23 वरून रू. 25, कोल्ड गोल्ड रू. 22 ऐवजी रू.24 तसेच 20 रूपये असलेली 450 मिलीलिटरची पिशवीवर रू.22 ग्राहकांना खरेदी लागणार आहे.









