व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांचा गौप्यस्फोट
प्रतिनिधी/ फोंडा
गोवा डेअरीत मागील 8 वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 14 कोटीचा भष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी केला आहे. डेअरीला लाभलेल्या घोटाळेखोर अध्यक्षांमुळेच राज्यातील दुध उत्पादक व संकलनावर परिणाम होत आहे. माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या कार्यकाळातील घोटाळय़ाचा पाढा वाचला जाणार म्हणून ते वैफल्यग्रस्त बनले असून गोवा डेअरीची बदनामी करत सुटले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पशुखाद्यासाठी युरियासारखाच ओप्टीजन पदार्थ रू. 6 रूपयाऐवजी रू. 140 प्रति किलो दराने खरेदी करून रू. 1 कोटी 34 लाखाचा घोटाळा झालेला आहे, असा दावा करुन फडते यांनी काल शुक्रवारी डेअरी संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मागील काही दिवसापासून फळदेसाई यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रशासक अरविंद खुटकर यांनी डेअरीचा ताबा घेतल्यानंतर फळदेसाई व टीमचे धाबे दणाणले आहे. त्यांना डेअरीचा चढता आलेख पाहवत नसून ते वैफल्यग्रस्त बनलेले आहेत. यांची अनेक कृत्ये या चौकशीतून समोर येणार असल्याचा सुगावा लागल्याने त्याने डेअरीला बदनाम करण्याचे सत्र आरंभले आहे, असा आरोप फडते यांनी केला आहे.
घोटाळय़ाप्रकरणी चार माजी अध्यक्ष रडारवर
डेअरीत मागील 8-10 वर्षाच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार उघड करण्याची लेखी तक्रार कुडतरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी सहकार खात्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. डेअरीचे माजी अध्यक्ष बाबुराव देसाई, माधव सहकारी, राजेश फळदेसाई, विठोबा देसाई यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झालेला आहे. घोटाळेखोरांना निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांनीही मोलाची साथ दिलेली आहे, अशी माहिती फडते यांनी दिली.
ओप्टीजन, कॉटन सिड एक्स्ट्रेट, म्हशीचे दुध खरेदीत घोटाळा
ओप्टीजन या युरियासारख्याच पदार्थाचा पशुखाद्यात पौष्टिकता वाढविण्यासाठी करण्यात येतो. या खरेदीत सुमारे रू. 1 कोटी 34 लाखांचा घोटाळा झालेला आहे. परराज्यातून म्हशीचें दुध घेताना सर्व नियम धाब्यावर बसवून सर्वोच्च दर नोंद केलेल्या निविदेशी करार करून साधारण 60 लाखाचे नुकसान डेअरीवर ओढवून घेतले आणि त्यात स्वहीत साधले. कॉटन सिड एक्स्ट्रेशन ऑर्डरमधील मागविण्यात आलेल्या 400 टन माल जनावरांना खाण्यासाठी उपयुक्त नसल्याचे सांगून पौष्टीक आहार तज्ञाकडून मारलेल्या शेऱयानंतरही सुमारे 129 टन मालाचा वापर करून घेत डेअरीला रू. 3 कोटी 39 लाख नुकसानी सहन करावी लागली, असेही फडते म्हणाले.
सद्यपरिस्थितीत फक्त चार खरेदी ऑर्डरची चौकशी करण्यात आली असून ही चौकशी केवळ हिमनगाचे टोक आहे. त्या कार्यकाळातील अशा अनेक खरेदी ऑर्डरची पडताळणी केल्यास सुमारे 13-14 कोटीचा घोटाळा असल्याची माहिती फडते यांनी दिली आहे.
डेअरीत मागील 8-10 वर्षाच्या कार्यकाळात झालेले घोटाळे
कोटन सिड घोटाळा- 3 कोटी 39 लाख
ओप्टीजन घोटाळा – 1 कोटी 34 लाख
म्हशीच्या दुध खरेदीत – 65 लाख
माजी संचालकडून डेअरी वाहनांचा दुरूपयोग
त्याशिवाय संचालकांकडून वापरण्यात आलेली डेअरीचे खासगी सफरीत सुमारे 11 लाख किलो मिटरची नोंद करण्यात आलेली आहे. त्यात वाहनाला रू. 10 प्रति किलोमिटर असा डेअरीकडून देण्यात आला आहे. संचालकांनी ऑफिस फॉर प्रोफिट असा प्रकार चालविलेला होता. त्याचा डेअरीवर अतिभार सुमारे रू. 1 कोटी 10 लाखांचा झालेला आहे. सर्व घोटाळय़ाची सखोल चौकशी झाल्यास सुमारे 14 कोटीचा भ्रष्टाचार मागील 8-10 वर्षाच्या कार्यकाळात झाला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी सांगितले आहे.
निमकोटेड युरीया घातक नाही
पशुखाद्यात युरीयाची मात्रा जास्त आढळल्यास गाईच्या आरोग्याला धोका असून ते हानीकारक असल्याचे मत फळदेसाई यांनी मांडले होते. यावर स्पष्टीकरण देताना फडते यांनी सांगितले की ई-टेंडरींग नुसार ‘युरीया’ खरेदीत 30 टन मालाची आर्डर देण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या हफ्यात 4 टन मालाची रवानगी करण्यात आली होती. माल पुरविणाऱया या कंपनीतर्फे पिशव्यावर फक्त युरीया असे नमूद केले होते. निम कोटेड युरीया असे नव्हते, एनडीडीबी कायद्यानुसार सदर माल वापरण्यापुर्वी प्रयोगशाळेत प्रक्रिया केली जात असून त्याच दिवशी चाचणीसाठी माल सुपुर्द करण्यात येतो त्याचा अहवाल 9 एप्रिल रोजी येणे अपेक्षित होते. यापुर्वीच सदर युरीया निमकोटेड असा साक्षात्कार माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांना कसा झाला? त्याला काय स्वप्न पडले की सदर युरीया निमकोटेड असल्याचे. यावर स्पष्टीकरण देतान डेअरीचे पौष्टीक आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार निमकोटेड युरीया हे जनावरांसाठी घातक नाही. राजेश फळदेसाई यांच्या कार्यकाळात खरेदी केलेल्या ओप्टीजनइतकेच घातक नसल्याचा दावा केला आहे.
कोविड काळात डेअरीने एकही दिवस बंद न पाळता गोमंतकीयाना दुध तुटवडा जाणू नये यासाठी दिवसरात्र काम सुरू ठेवलेले आहे. कामगार व कोविड काळात झटलेल्या सर्व दुध उत्पादक व डेअरी संलग्न सोसायटींचे आभार फडते यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई सांगितले की आपण डेअरीचे हित जपणारा शेतकरी आहे. आपली अध्यक्षीय कारकिर्द निष्कलंक असून कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. तसेच डेअरी हितासाठी एमडीशी यासंदर्भात चर्चा करण्यासही राजी असल्याचे मत व्यक्त पेले आहे.









