कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती
प्रतिनिधी / मडगाव

गोवा राज्य कृषी प्रधान व्हावे यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. याचाच एक भाग म्हणून, शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, कृषीमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी हल्लीच दक्षिण गोव्यातील शेतकऱयांचे मळे गाठले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शेतकऱयांशी प्रत्यक्ष चर्चा केली.
शेतकऱयाशी थेट संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेणे खुपच महत्वाचे होते. ज्यामुळे शेतकऱयांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येईल हा या भेटींमागचा उद्देश होता असे कृषीमंत्री श्री. कवळेकर यांनी सांगितले. या भेटींच्यावेळी कृषीमंत्र्या सोबत कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो, फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक संदीप फळदेसाई, कृषी अधिकारी सत्यवान देसाई, विभागीय कृषी अधिकारी शिवराम गावकर, गौरी प्रभुदेसाई, संदेश राऊत देसाई इत्यादी उपस्थित होते.
खोल भागात आधी खोल मिर्ची लागवड करणाऱया शेतकऱयांसोबत चर्चा केल्यानंतर, खोल भागातच असलेल्या पॉलीहाऊस चालविणाऱया होतकरू शेतकऱयांसोबत चर्चा केली. सध्या ऑर्किड फ्लॉवर व्यवसायाला संचारबंदीमुळे जबरदस्त फटका बसलेला असून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पॉलीहाऊस चालू ठेवायला कमीतकमी 50 हजार महिना खर्च होत असतो व त्यासाठी सरकाने मदत करावी असे या शेतकऱयांनी कृषीमंत्र्यांना सांगितले. कृषी खात्याने हा विषय हय़ा आधीच लक्षात घेऊन, ऑर्किड उत्पादकांचे सर्वेक्षणही केले आहे. सरकार लवकरच त्यावर निर्णय घेणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काणकोण तालुक्मयातील गावडोंगरी भागातील, सातुर्ली या भागातील शेतकऱयांनी 35 वर्षांनंतर जमीन लागवडीखाली आणली. या उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांना शाबासकी देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी सातुर्लीला भेट दिली. तसेच या भागातील शेतकऱयांनी पारंपरिक ऊस लागवड सोडून, भाजीची लागवड करून अगदी पहिल्याच प्रयत्नात चिटकी मिटकी, भेंडी आदी भाज्यांचे पीक घेतले.
नेत्रावळीत केली ऊस मळय़ाची पहाणी
नेत्रावळी येथील शेतकरी हर्षद प्रभुदेसाई यांच्या शेतीलाही मंत्र्यांनी भेट दिली. नेत्रावळीचा तोडणीविना राहिलेल्या 58 पैकी एका ऊस माळय़ाचीही यावेळी त्यांनी पाहणी केली. त्यानंतर कुर्डी वाडे कृषी उत्पादक सहकारी पथ संस्थेलाही त्यांनी भेट दिली. हल्लीच या तोडणी न झालेल्या ऊस उत्पादकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कृषीमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते.
केप्यात व सासष्टी तालुक्मयात भात कापणी यंत्राची शेतकी मंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. शेतकऱयांनी भटकी गुरे शेत खात असतात व त्यासाठी कुंपणाची गरज बोलून दाखवली. कृषी मंत्र्यांनी यावेळी कृषी संचालकांना खात्याच्या योजने अंतर्गत हे काम तातडीने हाती घ्यायचे निर्देश दिले.
इ-कृषी संपर्क अभियानाची सुरुवात
राज्यात लॉकडाऊनच्या काळात शेतकऱयापर्यंत अधिकाधिक माहिती पोचविण्यासाठी कृषी मंत्र्यांनी ‘व्हॉटसएप ग्रुप’ करण्याचे सुचविले होते. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्मयात किमान एक, असे हे ग्रुप तयार करण्यात आले असून, संबंधित विभागीय अधिकारी, खात्याचे उच्च अधिकारी आणि स्थानिक शेतकरी यांचा ग्रुपमध्ये समावेश असणार आहेत. खात्याच्या विविध योजना, शेतकऱयांना दृकश्राव्य माध्यमातून नविन तंत्रज्ञानाची माहिती, वेळोवेळी सुचना शेतकऱयांपर्यंत पोचवण्यासाठी या ग्रुपचा वापर करण्यात येणार आहे. इ-कृषी संपर्क या नावाने या योजनेचा शुभारंभ शेतकी मंत्र्याच्या हस्ते करण्यात आला.
8 वेगेवेगळय़ा शेतकी विषयांची माहिती देणारे पत्रक ही यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. सर्व क्षेत्रीय कृषी कार्यालयांतून हे पत्रक शेतकऱयांसाठी उपलब्ध राहणार आहे.









