प्रतिनिधी / बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱया पहिल्या 10 रेल्वे गाडय़ांमध्ये गोवा एक्स्प्रेसने 6 वे स्थान पटकाविले आहे. सन 2019-20 या वर्षात या रेल्वेने तब्बल 42 कोटी 49 लाख 94 हजारांचा महसूल जमा केला आहे. वास्को द गामा ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावणाऱया या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने महसुलात वाढ होत आहे.
पहिल्या 10 रेल्वेंमध्ये बेळगावमधून धावणाऱया गोवा एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. गोव्यातून दिल्लीपर्यंतचा प्रवास या रेल्वेमुळे प्रवाशांना करणे सोयीस्कर ठरत आहे. 39 तास 20 मिनिटांनी रेल्वे हजरत निजामुद्दीन येथे पोहचते. ताशी सरासरी 55 कि.मी. या रेल्वेची गती आहे. या प्रवासात 30 प्रमुख स्थानकांवर रेल्वेला थांबे देण्यात आले आहेत. एकूण 2 हजार 169 किलोमीटरचा प्रवास गोवा एक्स्प्रेस करते.
ही रेल्वे गोव्यावरून दिल्लीपर्यंत धावत असली तरी त्यामध्ये बेळगावचा वाटा सर्वाधिक आहे. बेळगावमधून दिल्लीला जाण्यासाठी ही रेल्वे सोयीची ठरते. त्यामुळेच बेळगावमधील लष्करी जवान या रेल्वेने सर्वाधिक प्रवास करताना दिसून येतात. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व दिल्ली या राज्यांमधून ही रेल्वे धावत असल्यामुळे प्रवाशांची संख्याही मोठी आहे.
स्लीपर कोचमधून सर्वाधिक महसूल
गोवा एक्स्प्रेसला टू टायर, थ्री टायर व स्लीपर असे आरामदायी कोच आहेत. टू टायर एसी कोचमधून 5 कोटी 86 लाख, थ्री टायर एसी कोचमधून 15 कोटी 61 लाख तर स्लीपर कोचमधून 21 कोटी 60 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उर्वरित महसूल जनरल कोचमधून जमा झाला आहे.
राजधानी एक्स्प्रेस पहिल्या क्रमांकावर
बेंगळूर ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणाऱया राजधानी एक्स्प्रेसने नैर्त्रुत्य रेल्वे विभागात महसुलामध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. या रेल्वेने वर्षभरात 137 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. दुसऱया स्थानी संघमित्रा एक्स्प्रेस असून 73 कोटींचा महसूल या रेल्वेने जमविल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
या शहरांमधून धावते गोवा एक्स्प्रेस
वास्को ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी ही रेल्वे मडगाव, कोलेम, दूधसागर, कॅसलरॉक, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, तळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा या रेल्वेस्थानकांवरून धावते.









