एक तास उशिरा आली ॲम्बुलन्स
खानापूर/ प्रतिनिधी
हल्ल्याळ रस्त्यावर गोल्याळी फाट्यानजीक बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (गुरुवारी दि १) दुपारी दोन वाजता घडली. जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीमाप्पा व्हनुर, पल्लवी हुन्नूर, यल्लाप्पा हुन्नूर आणि ऐश्वर्या व्हनुर अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कर्तन बागेवाडी येथील हे सर्वजण दुचाकीवरून आपल्या गावी चालले होते. दरम्यान गोल्याळी फाट्यानजीक शिरसी डेपोची बस बेळगावला येत होती. यावेळी दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीची बसला धडक बसली. यात हुन्नूर कुटुंबीय गंभीर जखमी झाले.
दरम्यानअपघातस्थळी 108 ॲम्बुलन्स वेळेत पोचू शकली नाही. त्यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. चारही जखमी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर तडफडत पडले होते. आजूबाजूच्या लोक 108 ॲम्बुलन्स ला संपर्क साधत होते. मात्र ॲम्बुलन्स एक तास उशिरा आली. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. वारंवार ॲम्बुलन्स साठी दूरध्वनी करून संपर्क ॲम्बुलन्स एक तास उशिरा आल्याने जखमींना उपचार वेळेवर मिळू शकले नाहीत. ॲम्बुलन्स आल्यानंतर जखमींना खानापूर येथील दवाखान्यात हलवण्यात आले.त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत नंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून नंदगड पोलीस पुढील तपास करत आहेत.