सामाजिक अंतर न पाळल्याने कोरोनाचा धोका
प्रतिनिधी/ पणजी
कोरोना महामारीचे संकट असतानाही बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात विविध पदांच्या नोकर भरतीसाठी मुलाखती देण्याकरिता हजारो उमेदवारांनी काल सोमवारी मोठी गर्दी केली. त्यावेळी सामाजिक अंतर पाळण्याचे भान कोणालाच राहिले नाही आणि सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा उमेदवारांनी सामाजिक अंतर राखावे म्हणून कोणतीच यंत्रणा नव्हती. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी राज्य सरकारवर आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
गोमेकॉतील विविध पदांसाठी आणि प्रामुख्याने कोविड 19 च्या व्यवस्थापनाकरिता सरकारने व आरोग्य खात्याने वृत्तपत्रातून मोठय़ा जाहिराती दिल्या आणि थेट मुलाखतीसाठी गोमेकॉत उमेदवारांना पाचारण केले. कोरोनाचे संकट कायम असतानाही उमेदवारांनी या भरतीला मोठा प्रतिसाद दिला आणि तेथे धाव घेतली. कोरोना असतानाही बेकार युवक युवती मोठय़ा आशेने नोकरीसाठी मुलाखत देण्याकरिता आले. यावरून त्यांना कोरोनाची भीती वाटत नसल्याचे दिसून आले.
सरकारमुळेच कोरोनाचे रुग्ण, बळी वाढले : काँग्रेस
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे गोवा युवक अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर आणि अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गोमेकॉत कोरोनाचे मोठय़ा प्रमाणात रुग्ण आहेत. तसेच येथे दररोज कोरोना रुग्णांचे बळी जातात. अशा ठिकाणी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले म्हणून डॉ. सावत आणि मंत्री राणे यांचा काँग्रेस पक्षाने चांगलाच समाचार घेतला. 144 कलम आणि सामाजिक अंतराचे तेथे तीन तेरा वाजले. सरकारच लोकांना नोकऱयांची आशा दाखवून एकत्र आणते. गर्दी करायला लावते आणि त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाचे रुग्ण व बळी वाढत चालले आहेत, असा ठपका काँग्रेस पक्षाने सरकारवर ठेवला आहे.
उमेदवारांमध्ये मोठय़ा प्रमाणात तरुणींचा सामावेश होता. त्या सर्व उमेदवारांना सरकारने कोरोनाच्या संकटात टाकल्याची टीकाही काँग्रेस पक्षाने केली आहे.









