पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराबद्दल संताप
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील गळत्या निवारणाकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. आयएमईआरसमोर आरपीडी रस्त्यावर मागील सहा महिन्यांपासून गळती असून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामधून गळतीद्वारे पाणी वाहत असूनही पाणीपुरवठा मंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
आरपीडी कॉर्नर ते येळ्ळूर रोडला जोडणाऱया रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. पण या रस्त्यावरील गळती निवारणाकडे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी कित्येक महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीद्वारे पिण्याचे पाणी 24 तास वाहत असते. काँक्रिटीकरणापूर्वी गळती निवारण करणे गरजेचे होते. पण पाणीपुरवठा मंडळ व स्मार्ट सिटी कंपनीमध्ये समन्वय नसल्याने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यापूर्वीच रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे गळतीद्वारे पाणी वाहत आहे. दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील गळतीबाबत नागरिकांनी महापालिका पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, पण याची दखल घेतली नाही.
काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही. मात्र गळती दुरुस्तीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या गळत्या अनेक ठिकाणी होत असून पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे गळती दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









