अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘गोंयकार घरा’च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केलेले मत ः गोवा फॉरवर्ड तसे सरकार आणण्यास प्राधान्य देणार, गोमंतकीयांच्या हिताची धोरणे व कायदे हवेत
प्रतिनिधी / मडगाव
गोमंतकीय जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवून तशी धोरणे व कायदे तयार होण्यासाठी पर्यायी सरकार येण्याची गरज आहे. त्यास गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्राधान्य राहील, असे पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या 50 व्या वाढदिवशी फातोर्डात उभारण्यात आलेल्या ‘गोंयकार घरा’चे उद्घाटन केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते.
यावेळी त्यांचे वडील जयवंतराव सरदेसाई, पत्नी उषा सरदेसाई, पक्षाचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर व शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, मडगावच्या नगराध्यक्षा पूजा नाईक, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज, अन्य नगरसेवक, पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘गोंयकार घरा’तून फातोर्डातीलच नव्हे, तर समस्त गोमंतकीयांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचे राजकारण चालेल, असे सरदेसाई म्हणाले. सध्या राज्यात गोमंतकीयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे रक्षण करणारी धोरणे तयार होताना दिसत नाहीत, तर अन्य राज्यांतील कायदे आणून गोमंतकीयांच्या माथी मारले जात असल्याची टीका त्यांनी केली. ध्वनिप्रदूषणविरोधी कायदा मध्यप्रदेशमधून आयात करून येथे लागू करण्यात आल्याने तो गोमंतकीयांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. यामुळे लग्न सोहळे साजरे करण्याच्या बाबतीत बंधने येऊ लागली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गोमंतकीयांच्या फायद्याच्या धोरणांची गरज
नोकऱया, व्यवसाय, शेती, खाण, उद्योग, पर्यटन यातून गोमंतकीय जनतेला जादा फायदा होईल अशी धोरणे तयार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पक्ष याकडे दुर्लक्ष करत आले असून यापुढेही तसेच होईल. त्यासाठी प्रादेशिक पक्षाची गरज असून आपला पक्ष त्यासाठी झटणार असल्याची ग्वाही सरदेसाई यांनी दिली. राजकीय धंदा करण्याचा आपल्या पक्षाचा हेतू नसून गोमंतकीयांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोमंतकीयांच्या जिवापेक्षा अर्थव्यवस्था महत्त्वाची नाही
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार व मुख्यमंत्री उघडे पडले आहेत. नियोजनाच्या अभावामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. वास्कोत लॉकडाऊनची गरज असताना तसे करण्यात आलेले नाही. कारण खनिज व कोळसा वाहतूक बंद पडेल याची चिंता सरकारला सतावत आहे. गोमंतकीय जनतेच्या जिवाचे या सरकारला पडून गेलेले नसून अर्थव्यवस्था कोलमडू नये याकडे मुख्यमंत्र्यांचे जास्त लक्ष आहे. गोमंतकीयांच्या जिवापेक्षा अर्थव्यवस्था जास्त महत्त्वाची ठरू शकत नाही याचे भान या सरकारने ठेवावे. अन्यथा येथील जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे सरदेसाई म्हणाले.
विरोधकांना लक्ष्य बनविण्याचे प्रकार
सध्या विरोधकांकडे दुर्लक्ष करणे तसेच विरोधक सत्तेत असलेल्या पंचायती, पालिकासारख्या स्थानिक स्वराज संस्थांना लक्ष्य बनविणे असे प्रकार सरकारकडून चालू आहेत. उदाहरणार्थ मडगाव पालिकेवर आपल्या पक्षाची सत्ता आहे. मात्र या पालिकेच्या कामांत खो घालणे, अडथळे आणणे असे प्रकार प्रशासकीय अधिकाऱयांना हाताशी धरून सुरू आहेत. या पालिकेच्या मुख्याधिकाऱयांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असताना व विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू असताना कोरोनाचे निमित्त पुढे करून या अधिकाऱयाची पाठराखण करणाऱया सरकारकडून महिला कर्मचाऱयांनी काय अपेक्षा बाळगायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
युवा पिढीला प्रशिक्षित करणार
युवा पिढी तळागाळातून पुढे येण्याची गरज आहे. राज्याचे भवितव्य त्यांच्या हातात असल्याने अशा युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. पंच, नगरसेवकांना आपले हक्क व अधिकारांची जाणीव असणे आवश्यक आहे. तरच ते त्यांच्यावर जाणूनबुजून अन्याय करणाऱया अधिकाऱयांविरुद्ध लढू शकतील, हे त्यांनी नजरेस आणून दिले.
भाजप सरकारला पाठिंबा ही कारकिर्दीतील घोडचूक
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आणि भाजप आमच्यासाठी संपला. गोमंतकीयांना एकत्र आणून यापुढे गोव्यात भाजपाला सत्तेवर येऊ दिले जाणार नाही, असे सोहळय़ात बोलताना विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. नंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले की, भाजप सरकारला पाठिंबा देऊन आपल्या राजकीय कारकिर्दीतील आपण मोठी घोडचूक केली. पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर या पक्षाच्या सरकारला दिलेला पाठिंबा आपल्या पक्षाने मागे घ्यायला पाहिजे होता. त्यावेळी आमच्याकडून चूक झाल्याने पक्षाचे अध्यक्ष या नात्याने आपण आपल्या कार्यकर्त्यांची व उर्वरित सर्व गोमंतकीयांची हात जोडून माफी मागतो, असे सरदेसाई यांनी सांगितले.









