‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन यांची आज जयंती (जन्म दि. 4 नोव्हेंबर 1894) त्यानिमित्त प्रा. सतीशचंद्र तोडणकर यांनी लिहिलेल्या ‘कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन’ या पुस्तकातील एक प्रकरण येथे पुनर्मुद्रित करत आहोत.
5 मे. 1948 रोजी अप्पांनी कणकवलीजवळील वाकदे गावात ‘गोपुरी आश्रम’ स्थापन केला. कोल्हापूरचे व्यापारी प्रभाकर कोरगावकर यांनी 45,000 रुपयांची देणगी दिली. त्यातून अप्पांनी गड नदीकाठी 18 एकर पडीक जागा खरेदी केली. अप्पा तेव्हा 57 वर्षांचे होते. ‘गोपुरी आश्रमाची योजना ही माझ्या तत्पूर्वीच्या चाळीस वर्षांच्या चळवळी, अनुभव, चिंतन, प्रयोग, संस्था संचलन, यशापयश इत्यादींचा परिपाक आहे’, असे अप्पा लिहितात.
सर्वश्री बाळूदादा पानवलकर, भास्कर सुकी व महादेव बांदेकर हे तीन स्वातंत्र्यसैनिक व तळवढय़ाचे कुलकर्णी या चार तरुणांसह गोपुरी आश्रम सुरू झाला. नंतर ह. धों बागलकर त्यात सहभागी झाले. त्यांनी तीन आरोलकर बंधूंना आणले.
गेली अनेक वर्षे ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ विजेते श्री. जयवंत (बापू) मठकर व प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर गोपुरीचे संवर्धन करीत आहेत. कै. शांताराम म्हाडेश्वर यांनी अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा खादी संघाचे चिटणीसपद सांभाळले. सध्या नेवगे हे सेवाभावी तरुण ते काम पाहतात.
तात्या करमळकर व दाजी धोंड यांनी सर्वोदय केंद्राचे संचालक म्हणून काम पाहिले. सर्वोदय योजनेतून अनेक शाळा चालविल्या जात होत्या. शेती व पशुपालनाचे प्रशिक्षण वर्ग व पोषण आहार व गोशाळांना मदत दिली गेली.
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी एका सभेत ‘सर्वोदय योजनेसाठी एक कोटी रुपये अप्पांच्या हवाली केले आहेत’, असे जाहीर केले. त्यामुळे गोपुरी आणि अप्पा अनेकांच्या मत्सराचे धनी बनले. प्रत्यक्षात ते पैसे संपूर्ण महाराष्ट्रात खर्च करायचे होते. असो. गोपुरीकडे वळू या.
अप्पांनी गोपुरीची उद्दिष्टे खालीलप्रमाणे सांगितली होती.
1) दलितोद्धार- दलितांना वर काढण्यासाठी आपण त्यांची कामे केली पाहिजेत.
2) वैज्ञानिक पद्धतीचे अवलंबन- शेती, गोपालन व ग्रामोद्योग यांची उत्पादनक्षता वाढविली पाहिजे. अन्न सकस पण स्वस्त व स्वस्त वस्त्र कसे बनविता येईल हे पाहिले पाहिजे. मलमूत्र, शेणमूत्र, काडीकचरा, मृतपशू यांचा सदुपयोग झाला पाहिजे. जमिनीची धूप थांबली पाहिजे, वाया वाहून जाणारे पाणी शेतीच्या कामी लावली पाहिजे. चर्मालय काढले पाहिजे.
3) बेकार जमीन, पाणी, खत व माणसे यांचा उपयोग केला पाहिजे.
4) स्वावलंबन- लोकांची मदत न घेता स्वकष्टावर जगायचे.
5) खादी-ग्रामोद्योग यांना अधि÷ान.
6) गोभक्ती-गोशाळा चालविणे. गोरक्षणासाठी 1928 पासून अप्पांनी फक्त गाईचे दूध पिण्याचे व्रत घेतले होते.
7) कणकवलीतील संडास-मुताऱयांचे खत वापरावे.
8) नोकरवृत्तीचे उच्चाटन करून सुखी नोकरीपेक्षा कष्टाचे स्वावलंबन लोकांनी करावे.
अल्पावधीत गोपुरीचे नंदनवन फुलले.
1953 मध्ये गड नदीला पूर आला. गोपुरीचे तर नुकसान झालेच पण कणकवली व मालवण तालुक्मयात हाहाःकार माजला. गोपुरीच्या मदतीला बरेचजण धावले पण स्वतः अप्पा मात्र इतर गावातील पूरनिवारणासाठी धावले. अप्पांनी महारवाडय़ात तांदूळ व डाळ वाटली. त्याची आठवण लोक अजूनही काढतात. मालोंडला तर लोकांची रेशनकार्डेही वाहून गेली होती. अप्पांनी दुकानदारांना त्याशिवाय धान्य द्यायला सांगितले. त्या काळात अप्पा म्हणजे सरकार होते. मामलेदारही त्यांना म्हणाले, तुम्ही केलेत ते योग्यच केले. संपूर्ण मालवण तालुक्मयात अप्पांनी नवीन कपडय़ांचे वाटप केले. त्यांचे काम पाहून रामकृष्ण मिशनचे संन्यासी म्हणाले, ‘आम्ही कसले संन्याशी? हे अप्पाच खरे संन्यासी आहेत.’ पुरात झेप घेऊन हा संन्याशी पाणी हटवतो आहे’, असे चित्र त्यावेळी चित्रकार दीनानाथ दलाल यांनी दिवाळी अंकावर छापले होते.
1956 मध्ये मुंबई राज्याने संपूर्ण दारुबंदी जाहीर केली. अप्पांनी अनेक ठिकाणी पोलिसांच्या मदतीने धाडी टाकून दारू ओतून टाकली. पण मग त्यांच्या लक्षात आले, की ‘The Reformer should not be Informer’ म्हणजे सुधारकाने पोलिसांचा खबऱया बनता कामा नये. त्यासाठी मन परिवर्तनच करावे लागेल.
16 जानेवारी 1956 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओवरून मुंबई केंद्रशासित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईत प्रचंड दंगे उसळले. अप्पासाहेब लोकानुनय करणारे संकुचित नेते नव्हते. अनेकवेळा ते लोकप्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस दाखवत. त्यांनी लगेच एक पत्रक काढले. त्यात म्हटले होते, “एखाद्या इस्टेटीवरून वाटणी करताना भावाभावात वाद झाले तर बाप ती सामायिक ठेवतो. तसे पंडित जवाहरलालजींनी केले आहे. यात महाराष्ट्राचा अपमान झाला असे मानण्याचे कारण नाही. एवढय़ाशा कारणावरून दंगे केल्याने आधीपासूनच बदनाम झालेला महाराष्ट्र आणखी बदनाम होईल. तरी मुंबईतील महाराष्ट्रीयांना विनंती, की त्यांनी राग आवरावा व दंगे थांबवावेत.’’
झाले! अप्पांना महाराष्ट्रद्रोही ठरवून त्यांची प्रेतयात्रा काढली गेली. गोपुरीलाही आग लावण्यात आली. गोपुरीवासियांनी मात्र पोलीस केस करायला नकार दिला. इकडे हे सगळे कळूनही अप्पा मालवण तालुक्मयात श्री. गोविंदराव शिंदे यांच्यासमवेत भूदानाचे काम पूर्ण झाल्यावरच गोपुरीत परत आले. जाळपोळ करणाऱया मंडळींमध्ये तरुणांचा, तोही परगावच्या तरुणांचा भरणा होता. कणकवलीतील जाणत्या माणसांनी जाहीर सभा घेऊन या गोष्टीचा निषेध केला.
‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या पत्रकाराने अप्पांना विचारले, की “तुमची प्रेतयात्रा काढली हे ऐकून तुम्हाला काय वाटले?’’ त्यावर अप्पा म्हणाले, “प्रेतयात्रा काढल्यावर काय वाटणार? मेल्यासारखे वाटले!’’ यामध्ये विनोद होता, तितकाच विषादही होता. एवढय़ा वर्षांच्या सेवेचे हेच का फळ? असेही अप्पांना वाटले असेल. (किंवा नसेलही वाटले.) लवकरच अप्पांच्या कणकवलीतील चाहत्यांनीच गोपुरीचे नुकसान भरून काढले. त्यावेळचे ते तरुणही पुढे अप्पांना फार मानू लागले.
यावेळी अप्पा पोलिसांना म्हणाले, ‘जनतेचे हे रौद्ररूप तात्कालिक असून ती कायम शिवस्वरुपीच असते. मुळात कोकणवासियांनी कितीही अवसान आणले, तरी त्यांच्यात हिंसेची प्रवृत्ती नसतेच!’ किती हा क्षमाशीलपणा!








