नफा तिमाहीत 139 कोटींवर – उत्पन्न 3 हजार कोटींवर
वृत्तसंस्था/ मुंबई
गोदरेज इंडस्ट्रिजने पहिल्या तिमाहीमध्ये 139 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. सदरचा नफा हा 101 टक्के अधिक असल्याचे दिसून आले.
मागच्या आर्थिक वर्षामध्ये समान तिमाहीत कंपनीने 69 कोटी रुपयांचा नफा कमाविला होता. सदरच्या कालावधीमध्ये कंपनीने 3 हजार 32 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे कंपनीचे एकूण उत्पन्न 3 हजार 101 कोटी रुपयांवर पोहचले आहे. जे मागच्या वर्षी समान कालावधीत 2 हजार 119 कोटी रुपये इतके होते. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या विक्रीमध्येही वर्षाच्या आधारावर पाहता 24 टक्के इतकी वाढ दिसली आहे. वर्षाच्या आधारावर एकत्रित नफा 38 टक्क्यांनी वाढला आहे.
सर्वच उद्योगांमध्ये बहर
कोरोनाचा काळ गोदरेज इंडस्ट्रिजला हातभार लावणारा ठरला आहे. कारण कंपनीच्या जवळपास सर्वच उद्योगांनी चांगली कामगिरी पार पाडली आहे. कोरोनाच्या काळामध्ये गोदरेजच्या हायजीन संदर्भातल्या उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. केमिकल क्षेत्रातून गोदरेजने जून अखेरच्या तिमाहीत 621 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. बांधकाम क्षेत्रातून कंपनीने याच कालावधीत 232 कोटी रुपये इतके उत्पन्न प्राप्त केले आहे.
आदि गोदरेज यांचा राजीनामा
दरम्यान गोदरेज इंडस्ट्रिजच्या चेअरमनपदाचा आदि गोदरेज यांनी राजीनामा दिला आहे. आता सदरची जबाबदारी त्यांचेच भाऊ नादिर गोदरेज यांच्यावर सोपवली जाणार आहे. कंपनीच्या बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आदि गोदरेज यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
1 ऑक्टोबरपासून नादिर यांच्याकडे सूत्रे
आदि गोदरेज यांनी राजीनामा दिलेला असला तरी सप्टेंबरअखेरपर्यंत ते चेअरमनपद सांभाळणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून भाऊ नादिर गोदरेज यांच्या हाती सूत्रे दिली जाणार आहेत. नादिर हे सध्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहेत.









