झाडे, गाळ काढण्याची मोहीम हाती घेणे आवश्यक : सिंधुदुर्गात 23 तलावात होते उत्पादन : गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन अत्यल्प
प्रतिनिधी / कुडाळ:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ज्या 23 गोडय़ा पाण्यातील तलावात मत्स्य उत्पादन घेतले जाते, त्या तलावातच वाढलेली झाडे व साचलेले दगड-माती यामुळे आवश्यक उत्पादन घेता येत नाही. जिल्हय़ाचे गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन अत्यल्प असून शासनाने तलावातील झाडे व गाळ काढण्याची मोहीम हाती घेतल्यास निश्चितच मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य आहे.
समुद्रातील मत्स्य दुष्काळ दिवसेंदिवस वाढत असून जानेवारीपासून मत्स्य दुष्काळ तीव्रपणे जाणवतो. त्यामुळे गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 21 लघु व 2 मध्यम स्वरुपाचे तलाव आहेत. जिल्हय़ात 550 हेक्टर क्षेत्र गोडय़ा पाण्याखालील मत्स्य उत्पादनास सद्यस्थितीत योग्य आहे. मात्र, फक्त 10 ते 15 टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. एवढय़ा क्षेत्रात अडीच ते तीन हजार टन उत्पादन मिळणे आवश्यक आहे. परंतु तसे उत्पादन मिळविण्यासाठी अनेक अडचणी येतात.
तलावामध्ये झाडे वाढली
जिल्हय़ातील एखादा-दुसरा अपवाद वगळता सर्वच तलावांमध्ये विविध प्रकारची रान व पाणवनस्पती वाढल्या आहेत. हे तलाव गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन घेण्यासाठी मत्स्य विभागाकडून निविदा काढून पाच वर्षांच्या करारासाठी संस्था किंवा व्यक्तींना दिले जातात. या तलावात संबंधित गोडय़ा पाण्यातील माशांचे बीज सोडतात. मात्र, मासे काढताना मोठमोठे मासे सर्रास तलावात वाढलेल्या झाडांच्या खाली मुळांमध्ये तसेच तलावाच्या गाळात राहतात. त्यामुळे हे मासे बाहेर काढणे अशक्य होते. झाडांच्या खाली जाळी पसरणे अवघड व नुकसानीचे ठरते. त्यामुळे व्यावसायिक पूर्ण क्षमतेने मत्स्य उत्पादन घेऊ शकत नाहीत.
सांडव्याला जाळय़ा नसल्याने मासे जातात बाहेर
बहुतांशी तलावाच्या सांडव्याला जाळय़ा नसल्याने मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर सांडव्यातून बाहेर शेतात किंवा ओढय़ात जातात. हे उत्पादन उत्पादक शेतकऱयांना मिळत नाही. त्यामुळे मोठे नुकसान संबंधितांना सहन करावे लागते.
तलावांची साफसफाई करणे आवश्यक
गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवायचे असेल, तर सर्व तलावांची साफसफाई करण्याचे काम शासनाने हाती घेणे आवश्यक आहे. दरवर्षी दोन-तीन तलावांचे काम जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून किंवा अन्य निधीतून हाती घेऊन तलावातील झाडे व गाळ काढल्यास तलाव साफ होतील. तलावांची गळती थांबविण्यास मदत होईल. पाणी साठविण्याची क्षमता वाढेल. तसेच आजूबाजूच्या विहिरींना पाण्याचा भरपूर साठा राहील.
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून काम करणे शक्य
गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत, त्या नुकत्याच शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, असे मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर व मत्स्य संशोधक डॉ. नितीन सावंत यांनी सांगितले. तसेच पाटबंधारे विभागाकडे तलावातील गाळ काढण्यासाठी तरतुद असेल, तर त्या निधीचा वापर करून तलावातील झाडे व गाळ काढल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अस्तित्वात असलेल्या तलावातून मोठय़ा प्रमाणावर गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादन घेणे शक्य आहे.
बीज सोडताना प्रामाणिकपणा अवलंबावा
तलाव भाडे तत्वावर दिल्यानंतर उत्पादक शेतकरी पहिली दोन-तीन वर्षे प्रामाणिकपणे मत्स्यबीज सोडतो. खरं तर मत्स्य अधिकाऱयांच्या उपस्थितीत हे बीज सोडायचे असते किंवा खरेदी केलेल्या मत्स्यबीजाच्या पावत्या पाहून खात्री करायची असते. परंतु तसे होत नाही. आपला करार संपणार असल्याने काही शेतकरी शेवटी एक-दोन वर्षे मत्स्यबीज सोडत नाहीत. त्यामुळे आवश्यक उत्पादन मिळत नाही.









