प्रतिनिधी / पाचगणी :
सातारा तालुक्यातील केंजळ गावच्या नजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने गोगावलेवाडी येथील युवक जागीच ठार झाला. शैलेश बाळाराम गोगावले (वय 23) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश गोगावले गुरुवारी सायं.7 च्या सुमारास मेढ्याहून आपल्या गावाकडे होळीसाठी येत होता. या दरम्यान केंजळ नजीक दुचाकी आली असता सातारा-मेढा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्याच्या दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. या धडकेत शैलेश हा जागीच ठार झाला. रात्री उशीर झाला तरी शैलेश घरी येत नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला असता अपघाताची माहिती कुटुंबियांना समजली. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









