बेळगाव : पोलीस हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाकाळात त्यांनी अहोरात्र सेवा बजावली आहे. त्यांची सोय लक्षात घेऊन गोगटे कुटुंबीयांनी गोगटे सर्कल येथे पोलीस चौकी उभारली आहे. त्याबद्दल प्रशासन कृतज्ञ आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले.
पोलिसांच्या सोयीसाठी गोगटे कुटुंबीयांतर्फे गोगटे सर्कल येथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे उद्घाटन सोमवारी आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. त्यागराजन म्हणाले, बेळगावच्या विकासासाठी गोगटे कुटुंबीय नेहमीच सक्रिय राहिले आहे. गोगटे कॉलेज, जीआयटी कॉलेज यासह अनेक संस्थांना त्यांनी देणगी दिल्या आहेत. कोरोनाकाळात पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांची सोय लक्षात घेऊन गोगटे कुटुंबीयांनी उभारलेल्या पोलीस चौकीमुळे ऊन्ह-पावसात उभ्या राहणाऱया पोलिसांना निवारा मिळणार आहे. पोलीस दलातर्फे मी गोगटे कुटुंबीयांना धन्यवाद देतो. प्रारंभी शिरीष गोगटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार अनिल बेनके यांचेही भाषण झाले. याप्रसंगी अरविंद गोगटे, आनंद गोगटे, अविनाश पोतदार, अजित सिद्दण्णावर, बसवराज विभुते, ओमकार व माधव गोगटे आदी उपस्थित होते.









