बारामतीसह चार संघांच्या दुधाची होणार पावडर, दररोज 50 टन पावडर तयार करण्याची गोकुळची क्षमता
विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
कोरोना व्हायरसमुळे राज्यातील अतिरिक्त दुधापासून पावडर तयार करण्यात येणार आहे. यातील दररोज 20 टन पावडरची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) ने उचलली आहे. राज्य सहकारी दूध संघ अर्थात ‘महानंदा’च्या बँडने ही पावडर तयार हेणार आहे. या बदल्यात राज्य सरकारकडून गोकुळला कर्न्व्हजन चार्जिस देण्यात येणार आहेत. शनिवारपासून पावडर तयार करण्यास प्रारंभही झाला. यामध्ये बारामती सहकारी दूध संघाचे सर्वाधिक दूध आहे.
पुणे विभागात पाच ते सात लाख लिटर दूध अतिरिक्त
राज्यावर कोरोना विषाणूचे अभूतपूर्व संकट आले आहे. यातून समाजातील एकही घटक सुटलेला नाही. शेतकऱयांपासून लहान मोठय़ा उद्योगांना कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे. विशेषतः शेतकऱयांना याची जबर किंमत मोजावी लागत आहे. तर अजून किती दिवस हे संकट राहील याचाही अंदाज बांधणे अवघड झाले आहे. बाजारात ग्राहक नसल्याने भाजीपाला शेतात सडत असताना शेतकऱयांकडे एकमेव उधरनिर्वाहचे साधन असलेले दुधच्या दरातही अतिरिक्तच्या नावाखाली दोन ते चार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली. सध्या दुधाला उठाव नसल्याने शेतकऱयांसह दूध संघही अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका पुणे विभागात पाच ते सात लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. या दुधापासून पावड तयार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून याची जबाबदारी महानंदावर सोपवली आहे.
दररोज 50 टन पावडर तर 20 टन लोणी
महानंदा दूध संघाकडून दररोज दोन लाख लिटर अतिरिक्त दूध गोकुळकडे पावडर तयार करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. पुणे, शिवामृत, बारामती, कोयना, फत्तेसिंगराव नाईक संघाचे दूध महानंदामार्फत गोकुळकडे येणार आहे. या संघांना कोठाही ठरवून दिला आहे. त्या प्रमाणातच त्यांनी दूध पाठवावे असे आदेश काढण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त गोकुळचे तीन ते साडेतीन लाख लिटर असे दररोज पाच लाख लिटर दुधापासून 50 टन पावडर व 20 टन लोणी तयार करण्यात येणार आहे.
पावडर निर्मितीतून गोकुळला किलोला 14 रुपयांचा तोटा
10 लिटर दुधापासून एक किलो पावडरला 30 तर चार किलो लोणी तयार करण्यासाठी 14 रुपये खर्च येतो मात्र महानंदाकडून पावडरसाठी 21 व लोणीसाठी 9 रुपये कर्न्व्हजन चार्जिस देण्यात येणार असे सांगण्यात आले आहे. मात्र सरारसरी 14 ते 15 रुपये तोटा होत आहे. हा तोटा भरुन कसा काढणार असा प्रश्न गोकुळमसोर आहे. महानंदाच्या नावाने ही पावडर व लोणी तयार होणार आहे. याचाही अतिरिक्त खर्च गोकुळवर पडू शकतो.
महानंदाकडून गोकुळला दिलेला कोटा (लिटर हजार)
पुणे सहकारी संघ 40
शिवामृत 40
बारामती 1.00
कोयना 10
फत्तेसिंगराव नाईक 10
एकुण 2 लाख लिटर
राज्यातील दूध संघांची पावडर निर्मितीची क्षमता (टन)
शासकिय 51
सहकारी 163
खासगी 596
एकुण 810
राष्ट्रीय काम म्हणून जबाबदारी स्वीकारली
कारेनाच्या विरोधातील लढाईत गोकुळ कुठेही मागे नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नुकतीच 51 लाखांची मदत दिली. आता पावडरसाठी सरकारने दिलेले कन्व्हर्जन चार्जिस कमी असले तरी राष्ट्रीय काम म्हणून सध्या जबाबदारी स्वीकारली आहे. – रविंद्र आपटे,चेअरमन गोकुळ








