मनपा आयुक्तांनी बैठक घेण्याची आवश्यकता
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीच्या अडथळय़ामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात गॅसलाईन घालणे अडचणीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येत्या काही महिन्यात 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळीच शहराच्या मध्यवर्ती भागात गॅसलाईन घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याकरिता पाणीपुरवठा मंडळ, महापालिका आणि मेगा गॅस इंजिनिअरिंग कंपनीची संयुक्त बैठक बोलावणे आवश्यक आहे.
शहरात गॅसलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. मात्र, शहरातील काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे टिळकवाडी, शहापूर, कॉलेज रोड, वडगाव अशा प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पेव्हर्स घालण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शास्त्रीनगर परिसरात पेव्हर्स घालण्याचे काम सुरू आहे. विविध सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ठिकठिकाणी पाईप घालून डक्ट तयार केले आहेत. मात्र, या पाईप आणि डक्टच्या माध्यमातून गॅसलाईन घालणे धोकादायक असल्याचे मत मेगा गॅस इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रतिनिधीने व्यक्त केले. पाईपमधून गॅसलाईन घातल्यानंतर कोणत्याही प्रकारची गळती असल्यास समजणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे डक्ट लहान आकाराचे असल्याने त्या ठिकाणी गॅसलाईन जोडणी करणे अडचणीचे आहे. याचा फटका शहरांतर्गत गॅसलाईनचा विस्तार करण्यास बसत आहे. त्यामुळे याबाबत पर्याय शोधून शहरांतर्गत गॅसलाईन घालण्याचा विचार कंपनीने चालविला असल्याची माहिती दिली.
कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आवश्यक साहित्य अपुरे पडत आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात गॅसजोडणी करून घेण्यास विलंब होणार आहे. सध्या गॅस जोडणीकरिता नोंदणीदेखील बंद ठेवण्यात आली आहे. महापालिकेने सहकार्य केल्यास शहरांतर्गत गॅसजोडणी करण्यास सोयीचे होऊ शकते, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.
शहरवासियांना एकाचवेळी दोन्ही सुविधांचा लाभ होऊ शकतो
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्याकरिता जलवाहिन्या घालण्यासाठी तसेच घरोघरी नळ जोडणीकरिता खोदाई करण्यात येणार आहे. या दरम्यान गॅसवाहिन्या आणि गॅसजोडणी करून देणे शक्मय आहे. त्यामुळे शहरवासियांना एकाचवेळी दोन्ही सुविधांचा लाभ होऊ शकतो. याकरिता मेगा गॅस कंपनीने विचार चालविला असून, एल ऍण्ड टी कंपनीशी संपर्क साधण्यात येणार आहे. मात्र, शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊ नये व शहरवासियांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने याप्रकरणी महापालिका प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
महापालिका आयुक्तांनी प्रस्तावाचा विचार करावा
यापूर्वी विद्युत वाहिन्या घालण्यासाठी आणि डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने रस्ते खराब झाले आहेत. गॅसवाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई त्यानंतर पुन्हा जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करावी लागणार आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्मयता आहे. रस्त्यांची दुरवस्था टाळण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या आणि गॅसवाहिन्या एकाचवेळी घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याकरिता महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीची आणि गॅस कंपनीची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाचा विचार करावा, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.