प्रतिनिधी / माळशिरस
तरंगफळ (ता. माळशिरस ) येथे सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसच्या गळतीमुळे अचानक लागलेल्या आगीमुळे आई व दोन मुले भाजली त्यात दोन्ही मुलासह आईचा मृत्यू झाला. आई सोनल ज्ञानेश्वर शिंदे (वय -३०) व सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय ७ ) व कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय ५ ) अशी मृत्यू झालेल्या आई व मुलांची नावे आहेत .
याबाबत मिळालेली माहिती अशी की आई सोनल सकाळी स्वयंपाक करीत होती ती काही कामाने बाहेर आली होती .घरात अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका होऊ लागला .यावेळी दोन्ही मुले घरात झोपलेली होती .आगीचा भडका दिसताच मुलाची.आई सोनल झोपलेल्या मुलांना काढण्यासाठी घरामध्ये गेली. परंतु आगीचा भडका वाढत गेला होता त्यामुळे आईला मुलांना दरवाजातून बाहेर घेऊन येता येईना . गॅसच्या गळतीमुळे आग लागली असल्यामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट होईल या भीतीमुळे कोणीच आत जाण्यास धजावेना .
अशातच गावातील नामदेव एकनाथ कांबळे व पप्पू सर्जेराव कांबळे यांनी धाडस दाखवून गावकऱ्यांच्या साह्याने पाठीमागील भिंत पाडून दोन लहान मुले व आई यांना बाहेर काढले. तिघेही जास्त भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत होते .त्यांना तातडीने अकलूज येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तोपर्यंत सावळा ज्ञानेश्वर शिंदे या मुलाचा मृत्यू झाला होता . आई सोनल व मुलगा कृष्णा जास्त भाजले असल्याने त्यांना सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात येत असताना कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे याचा मृत्यू झाला .आई सोनल हि गंभीर अवस्थेत होती तिला सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते परंतु तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी मल्लिनाथ लकडे व पल्लवी डांगे घटनास्थळी आले होते या घटनेमुळे तरंगफळ गावात शोककळा पसरली आहे .
दोघांनी दाखवले धाडस
गॅसगळती मुळे लागलेल्या आगीत भडका होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो म्हणून गावातील लोक केवळ पाहून भयभीत होऊन बाहेर निघून जात होते. परंतु गावातील नामदेव एकनाथ कांबळे व पप्पू सर्जेराव कांबळे यांनी धाडस दाखवून भिंत पाडून सर्वाना बाहेर काढले .