ऑनलाईन टीम / मुंबई :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले असून, त्याचे नामकरण ‘गुलाब’ असे करण्यात आले आहे. हे चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ओडिशाच्या गोपालपूरमपासून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम आणि कलिंगपटनमच्या तटीय भागात धडक देऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाकडून ओडिशा आणि आंध्रप्रदेशात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. कोकणात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान वाऱयाचा वेग वाढून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हावडा, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, मिदनापूर या भागात वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या वादळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी युनिफाईड कमांड सेंटर नावाने एक कंट्रोल रुम सुरु करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट देण्यात देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे पूर्वेकडील समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.









