प्रतिनिधी / पन्हाळा
गुगल पे वरून स्वत:च्याच मोबाईल वर 250 रुपयांचे रिचार्ज मारताना तब्बल 48 हजारांचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संज्योती माणिक नायकवडी यांनी पन्हाळा पोलिस ठाणे व सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
नायकवडी यांनी आपल्या मोबाईल नंबर वर गुगल पेद्वारे 250 रुपयांचा रिचार्ज मारला होता. पण त्यांच्या बँक खात्यातुन चुकून 2500 रुपये कमी झाले. याबाबात तसा त्यांना काही मनिटांतच फोन आला व हे 2500 रुपये आपल्या खात्यावर पुन्हा जमा केले जातील, असे सांगितले. मात्र त्यासाठी आपल्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर येईल, तो आपण सांगावे. सुरुवातीला नाईकवडी यांनी ओटीपी नंबर देण्यास टाळाटाळ केली. पण 2500 रुपये आपल्या खात्यावरुन कमी होतील, या भितीपोटी त्यांनी ओटीपी नंबर दिला. हा ओटीपी नंबर देताच त्यांच्या मोबाइलवर तीन वेगवेगळ्या सिमकार्ड द्वारे मेसेज आले. त्यानंतर त्यांना आपल्या बँक खात्यातुन 48 हजार रुपये कमी झाल्याचे समजले.
दरम्यान तक्रारदार महिलेने ही घटना आपल्या पतीला कळविली. त्यानंतर हे दोघे पती-पत्नी ज्या बँक खात्यातून पैसै कमी झाले, त्या पन्हाळा येथील युनियन बँक आँफ इंडिया या शाखेत गेले. येथे त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. पण कोणतीही बँक पैसे परत खात्यावर जमा करण्यासाठी ओटीपीची मागणी करत नाही, असे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे आपल्या बँक खात्यावरुन 48 हजारांची आँनलाईन चोरी झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ पन्हाळा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला. तसेच सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडेही तक्रार अर्ज दिला. एकूणच या घटनेमुळे पन्हाळ्यात खळबळ उडाली आहे. तरी ही चोरी कशा पद्धतीने झाल, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.









