कोरोना रुग्ण संख्येत होतेय किंचित वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ात कोरोनारुग्ण संख्येत किंचित वाढ होत आहे. गुरुवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 352 वर पोहोचली आहे. दिवाळीत नियम उल्लंघनाचे प्रकार वाढल्याने रुग्णसंख्याही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 12 व ग्रामीण भागातील 2 असे एकूण तालुक्मयातील 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. बाळेकुंद्री, हिरेबागेवाडी, आनंदनगर-वडगाव, कुमारस्वामी लेआऊट, रामतीर्थनगर, राणी चन्नम्मानगर, सह्याद्रीनगर, शाहूनगर, स्वामी विवेकानंदनगर-टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यंत जिल्हय़ातील 2 लाख 58 हजार 481 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 2 लाख 29 हजार 767 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्हय़ातील 24 हजार 621 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 391 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाची लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
अद्याप 1 हजार 930 अहवाल यायचे आहेत. तर 27 हजार 662 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. दसरा, दिवाळीत नियमांचे उल्लंघन झाल्याने रुग्ण संख्येत वाढ होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करुनही मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर याचा नागरिकांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.
इराण्णा कडाडी यांना कोरोना
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना लक्षणे नाहीत. त्यामुळे ते आपल्या घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनच्या काळापासून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये खास करुन भाजप शेतकरी मोर्चाच्या उपक्रमात त्यांनी भाग घेतला होता. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.









