अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला सद्गुरूंचे महात्म्य सांगत आहेत. ते म्हणाले, संसारवृक्ष अतिशय पुरातन असून वासनेच्या लक्षावधी मुळय़ांनी त्याला जमिनीत घट्ट धरून ठेवला आहे. जो वैराग्य स्वीकारेल म्हणजे आहे त्यात समाधानी राहील तोच ह्या संसारवृक्षाचे छेदन करू शकेल. वैराग्य सोडून भिन्न भिन्न प्रकारची कोटय़वधी साधने केली तरी संसारवृक्षाचे छेदन व्हावयाचे नाही. वैराग्य अंगी येण्यासाठी केवळ एक गुरुभक्तीच आहे असे समज.
पातक नष्ट करण्यास ज्याप्रमाणे गंगाजळ समर्थ आहे, त्याप्रमाणे गुरुभक्ति हीच संसारभयाचे भस्म करते हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. कुलदेवता ही सर्वश्रे÷ मानतात पण गुरु ही कुलदेवतेचीही देवता आहे. आपल्या प्रत्येक कर्मात त्याला पूज्यत्व आहे. कल्पतरु हा कल्पना करावी तेवढेच दान देतो, परंतु सद्गुरु हा पूर्ण निर्विकल्पताच देतो. ती निर्लोभता दिल्याने फार मोठे दान दिल्याप्रमाणे होते. चिंतामणि हा ज्या गोष्टीचे चिंतन करावे तेवढीच वस्तु देतो. परंतु सद्गुरु हा मुळी चिंतेचाच नाश करतो व चित्ताला मारून चैतन्याचे शाश्वत दान देतो. कामधेनूचे दुभते असते ते इच्छेपुरतेच असते पण सद्गुरु हा स्वानंदाचाच रस देत असल्यामुळे इच्छेलाच नाहीशी करतो. समुद्र हा गुरूसारखा गंभीर आहे खरा पण सदोदित खारट असतो. गुरु हा सर्वदा स्वानंदाने भरलेला असून आत्मबोधामुळे अत्यंत मधुर असतो. गुरु हा ब्रह्मासारखा म्हणावा, तर ती उपमाही थोडीशी कमीच पडते. कारण, गुरुच्या उपदेशानेच ब्रह्माला सत्यत्व येते.
नाही तर ब्रह्म हे केवळ शाब्दीकच होय. म्हणून त्याच्याहून अधिक पूज्य असा त्रैलोक्मयातही कोणीच नाही. म्हणून गुरु हीच माता, गुरु हाच पिता, गुरु हाच स्वामी व गुरु हीच कुलदेवता होय. जो गुरूशिवाय अन्य देवतेचे स्मरणच मुळी करत नाही. मोठे दुर्धर संकट आले असता किंवा ज्यावेळी आकाश कोसळून अंगावर पडते तेव्हाही जो दुसऱयाकडे ढुंकूनसुद्धा न पहाता गुरूचेच नामस्मरण करीत राहतो. शरीर, वाणी, मन व प्राण ह्यांनी जो गुरूशिवाय इतराना जाणत नाही आणि तसाच जो अनन्यभावाने गुरूचे भजन करतो त्याच्या त्या भक्तीचे नांव ‘गुरुभक्ति’ होय. पक्षिणीची पंख न फुटलेली पिले असतात ती सर्वदा तिचाच ध्यास करीत असतात. त्याप्रमाणे जो जागृतीत, स्वप्नात किंवा सुषुप्तीतही गुरूशिवाय दुसरे काही स्मरतच नाही. उद्धव म्हणाला, मागे भगवद्?भजन सांगितलेस आणि आता गुरूची सेवा सांगतोस. तेव्हा तुझे हे निरूपण एकसूत्रीपणाचे वाटत नाही. भगवंत म्हणाले, अरे, सद्गुरु माझीच मूर्ति आहेत हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. ह्याविषयी संशय धरू नये. ह्याचंच नाव अनन्यभक्ति. एकाग्रतेने गुरूचे भजन केले की, ते माझे मोठे पूजन होय. कारण गुरु आणि मी अशा दोघांमध्ये कल्पांतीसुद्धा कधी वेगळेपणा असत नाही. गुरु आणि भगवंत हे दोन्ही एकच आहेत, अशा भावनेने जो निश्चयपूर्वक भजन करतो, तोच गुरूचा सेवक होय. माझ्याशी ऐक्मय व्हावे म्हणून ज्याने अत्यंत प्रेमाने गुरुभक्ति स्वीकारली, तोच त्रैलोक्मयामध्ये धन्य धन्य होय. नाथबाबांनी भगवंतांचं मनोगत त्यांच्या अभंगात हुबेहूब उतरवलंय ते म्हणतात, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, देव तयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा । एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय। बाबा म्हणतात, गुरु म्हणजेच परमात्मा, परेश आहे असा ज्याचा दृढविश्वास आहे त्याचा देव अंकित झालेला असल्याने देव स्वतःहूनच त्याच्या घरी येतो. जनार्दन स्वामींचे नाव घेऊन सांगतो की, यात काहीही संशय नाही. आता असा उत्तम शिष्य सद्गुरूंचे भजन कसे करतो त्याचे स्वरूप ऐक. गुरूची सेवा करण्यासाठी त्याचा देह मनाच्याही पुढे धावत असतो व सर्व सेवा मी एकटाच करीन अशी त्याची महत्त्वाकांक्षा असते. जेव्हढी अधिक सेवा पडेल तो तो हा अधिक उत्साहाने सेवेला तयार होऊन राहतो. त्याने सर्व देह केवळ सेवेप्रीत्यर्थच वाहिलेला असतो. गुरुसेवेमध्येच त्याला विश्रांति वाटते. गुरुसेवेच्या आवडीच्या अधिकाधिक भराने त्याला गुरुभजनामध्ये वाढती गोडी वाटत असते.
क्रमशः







