दोघा संशयितांना अटक : सहा गुरांची सुटका
वार्ताहर/ दाभाळ
दत्तगड-बेतोडा येथून सहा गुरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारा रिक्षा स्थानिक युवकांनी पकडून दिला. एकाच वाहनांत दाटीवाटीने या सहा गुरांना कोंबण्यात आले होते. या प्रकरणी उस्मान सय्यद खान (51, रा. वाळपई) व मलिक बेपारी (30, रा. उसगाव) या दोघाही संशयितांना फोंडा पोलिसांनी अटक केली. सर्व गुरांची सुटका करुन उसगाव येथील गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास जीए 04 टी 4402 या क्रमांकाचा रिक्षा सहा गुरांना घेऊन दत्तगड बेतोडा येथून निघाला होता. कोडार-उसगावमार्गे वाळपई येथे या गुरांना घेऊन जाण्याचा संशयितांचा बेत होता. यावेळी रिक्षाच्या पाठिमागून दुचाकीवरुन येणाऱया दोघा स्थानिक युवकांना त्याबाबत संशय आला. एवढय़ा उशिरा रात्री आडमार्गाने गुरांची वाहतूक करण्यामागे काहीतरी काळेबेरे असावे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचा पाठलाग केला व पोडले बेतोडा येथील वळणावर हा रिक्षा अडविला. दोघाही संशयितांकडे गुरांच्या वाहतुकीसंबंधी चौकशी केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने हा गुरांच्या बेकायदेशीर वाहतुकीचा किंवा तस्करीचा प्रकार असावा, हे स्पष्ट झाले. गावातील इतर युवकांना घटनास्थळी बोलावून घेत, बेतोडा पोलीस चौकीवर संपर्क साधण्यात आला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांही संशयितांसह रिक्षा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी सविस्तर चौकशीअंती दोघाही संशयितांना अटक केली व सहाही गुरांची उसगाव येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली. ही सहा गुरे नेमकी कुठून आणली होती व त्यांना कुठे नेले जात होते याची सखोल चौकशी होण्याची गरज स्थानिक युवकांनी व्यक्त केली आहे.
बेतोडा भागात गुरांच्या तस्करीचे प्रकार
दरम्यान बेतोडा भागात रात्रीच्यावेळी रस्त्यावर बसणाऱया भटक्या गुरांची काही अज्ञातांकडून तस्करी होत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत. रस्त्यावर बसणाऱया गुरांना पकडून रातोरात बेकायदेशीर कत्तलखान्यात नेले जात असल्याचे स्थानिक युवकांचे म्हणणे आहे. गुरांच्या या तस्करीमागे सराईत टोळी कार्यरत असून त्यादृष्टीने तपास करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून केली जात आहे. ढवळी येथे फोंडा-मडगाव महामार्गाजवळ भटकणारी भटकी गुरे दोन महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात अशाचप्रकारे रात्रीच्यावेळी टेंपोत घालून पळविली जात होती. गाईची छोटी वासरे हेरुन त्यांची तस्करी केली जात असल्याच्या तेथील दुकानदारांच्या तक्रारी होत्या.









