गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण 43 टक्क्यांवर : 2019 मध्ये गुन्हय़ांचे प्रमाण 169 ने घटले
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत 2019 या वर्षात गुन्हय़ांचे प्रमाण 169 ने कमी झाले आहे. त्याचबरोबर गुन्हे शाबित होण्याचेही प्रमाण वाढले असून जिल्हा न्यायालयामध्ये दाखल झालेल्या खटल्यामध्ये 34 टक्के, तर तालुका न्यायालयामध्ये दाखल खटल्यांमध्ये 43 टक्के गुन्हे शाबित करण्यात यश आले आहे. गुन्हय़ाचे प्रमाण कमी करणारा आणि गुन्हे शाबित करणारा सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2018 या वर्षात खून, चोऱया, मारामाऱया, बलात्कार असे विविध प्रकारचे 1 हजार 93 गुन्हे दाखल होते. मात्र 2019 या वर्षात 924 गुन्हे दाखल झाले असून 169 गुन्हे कमी झाले आहेत. गुन्हय़ाचे प्रमाण कमी करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे 2019 या वर्षात लोकसभा व विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणुका झाल्या. मात्र दोन्ही निवडणुकांमध्ये कुठलीही राजकीय राडेबाजी किंवा मारामाऱया न होता शांततेत निवडणूक पार पडली. पोलिसांनी बंदोबस्ताची चोख भूमिका पार पडल्याने अनुचित प्रकार न घडता निवडणुका पार पडल्या. तसेच इतरवेळीही मारामाऱया होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
गुन्हय़ाचे प्रमाण 169 ने घटले
2018 या वर्षात 1 हजार 93 गुन्हे होते, तर 2019 या वर्षात 924 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे 169 गुन्हे कमी झाले आहेत. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही वाढले आहे. 2018 या वर्षात 712 गुन्हे उघडकीस आले होते आणि 301 गुन्हे उघड झाले नव्हते. 2019 या वर्षात 698 गुन्हे उघडकीस आले असून 227 गुन्हे उघड झालेले नाहीत. त्यामुळे गुन्हे उघड न होण्याचे प्रमाण यावर्षी कमी आहे. तसेच इतर गुन्हय़ांमध्येही घट झाली आहे. खुनाचे गुन्हे 2018 मध्ये नऊ होते. 2019 मध्ये ते आठ आहेत. खुनाचा प्रयत्न करणे 2018 मध्ये 17 गुन्हे होते. 2019 मध्ये 15 गुन्हे दाखल आहेत. दरोडय़ाचे 10 होते, आता सात गुन्हे दाखल आहेत. चोरीचे 242 होते, आता 226 गुन्हे दाखल आहेत. दंगलीचे 55 होते, आता 29 दाखल आहेत. विनयभंगाचे 62 होते, आता 51 दाखल आहेत. प्राणघातक अपघाताचे 86 गुन्हे दाखल होते, आता 71 दाखल आहेत. त्याशिवाय इतर विविध गुन्हे मिळून 924 गुन्हे 2019 या वर्षात दाखल आहेत, तर गेल्यावर्षी 1 हजार 93 गुन्हे दाखल होते. त्यामुळे गुन्हय़ांचे प्रमाण 2019 या वर्षात कमी झाले आहे.
गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण वाढले
पोलिसांकडे दाखल झालेल्या एकूण गुन्हय़ांपैकी 41 खटले सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये 2019 वर्षांत दाखल केले होते. त्यापैकी 14 गुन्हे शाबित झाले आहेत. गुन्हे शाबित होण्याचे 34 टक्के प्रमाण आहे. 2018 या वर्षात जिल्हा न्यायालयामध्ये 37 गुन्हय़ांचे खटले जिल्हा न्यायालयामध्ये दाखल होते. पैकी सात गुन्हे शाबित झाले. 19 टक्के शाबित होण्याचे प्रमाण होते. तसेच जिल्हय़ातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकूण 1 हजार 286 खटले दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 550 खटल्यांमध्ये गुन्हे शाबित झाले आहेत. गुन्हे शाबित होण्याचे हे प्रमाण 43 टक्के आहे. 2018 या वर्षात एकूण 1 हजार 128 दाखल खटल्यात 338 खटले शाबित झाले होते. हे 30 टक्के प्रमाण होते. त्यामुळे सिंधुदुर्गात गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल
गुन्हय़ाचे प्रमाण कमी करणे आणि गुन्हे शाबित होण्याच्या प्रमाणातही वाढ करणारा सिंधुदुर्ग संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. नुकतीच मुंबईत राज्यस्तरीय क्राईमची मिटिंग झाली. यामध्ये पोलीस महासंचालकांकडून सिंधुदुर्ग पोलीस दलांचे कौतूक करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग पोलिसांनी अधिक कार्यक्षमतेने काम करीत, विविध गुन्हय़ांचा तपास वेळच्यावेळी करीत असल्याने गुन्हे उघड होण्याचे प्रमाणेही वाढले आहे. वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे, पक्षपातीपणा किंवा दबावाला बळी न पडता काम केले आहे. पोलीस ठाण्यात आलेल्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली. प्रत्येक तक्रार नोंद करून घेण्यात आली. गुन्हय़ांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच गुन्हे शाबित होण्यासाठी गुन्हय़ाचा तपास योग्य रितीने केला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात गुन्हय़ांचे प्रमाण कमी करणे व ते शाबित करण्यास यश आल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
दाखल गुन्हे
2018 1.93 हजार
2019 924
उघडकीस आलेले गुन्हे
2018 712
2019 698








