-गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
गुजरातमधील अदानी पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात देशात ड्रग्ज सापडणे हे भारताच्या जागतिक प्रतिमेला धोका पोहोचवणारे आहे. त्यामुळे केंद्र शासनाने यामध्ये पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, अदानीच्या एअर पोर्टवर 25 हजार कोटींची ड्रग्ज पकडले. पण त्याची चर्चा कुठेही होत नाही. ही जगातली सर्वात मोठी कारवाई आहे. एकाचवेळी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडणे जे जगाच्या इतिहासात असे कधी घडले नाही. एवढी मोठी कारवाई असतांना त्याची चर्चासुद्धा होत नाही. त्यामुळे नेमके या देशातील धोरण काय चालले आहे. केंद्र सरकार देश कोणत्या बाजूला घेऊन जात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. हे ड्रग्ज कुणासाठी आणले होते ? कुठे जाणार होते ? हा प्रश्न आहे. जगभरात शांतताप्रिय देश अशी भारताची ओळख आहे. असे असताना या ड्रग्ज या प्रकरणामुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर कमी झाली आहे. याला सरकारचा पाठिंबा होता का ? नसेल तर सरकार कारवाई का करत नाही ? असा प्रश्न उपस्थित करत गृहराज्यमंत्री पाटील यांनी केंद्र शासनाने यामध्ये पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली.