लिरेनची अडचणीच्या स्थितीतून सुटका, जागतिक अजिंक्यपदासाठीचा सातवा सामनाही बरोबरीत
वृत्तसंस्था/ सिंगापूर
जगज्जेत्याच्या मुकुटासाठीचा सर्वांत तऊण आव्हानवीर डी. गुकेशने अतिशय अनुकूल स्थिती हातातून जाऊ दिल्याने जागतिक विजेतेपदासाठीच्या लढतीतील मंगळवारी झालेल्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविऊद्ध सलग चौथ्या बरोबरीवर त्याला समाधान मानावे लागले.
5 तास आणि 22 मिनिटांच्या ताण आणणाऱ्या खेळानंतर नोंदल्या गेलेल्या या बरोबरीने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 3.5 गुणांच्या समान स्तरावर पुन्हा आणून सोडले आहे. लढत जिंकण्यासाठी त्यांना आणखी चार गुणांची गरज आहे. दोन्ही खेळाडूंनी 72 चालीनंतर सामना बरोबरीत सोडविणे मान्य केले. खरे तर गुकेशकडून चूक होईपर्यंत लिरेनसाठी हा पुन्हा कठीण दिवस ठरून बराच वेळ तो पराभवाच्या सावटाखाली राहिला होता.
पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या भारतीयाला मोठी अनुकूलता प्राप्त झाली होती. पण आतापर्यंतच्या लढतीतील सर्वांत दीर्घ काळ चाललेल्या या सामन्यात गुकेशने घातलेला घोळ चिनी खेळाडूच्या पथ्यावर पडला. बुद्धिबळ पंडितांना लिरेनसाठी ‘एंडगेम’ सामना गमावणारा असल्याचे वाटले होते. पण आश्चर्यकारकरीत्या तो त्यातून बचावला.
त्याआधी गुकेशने प्रभावी ओपनिंगच्या जोरावर लिरेनच्या नाड्या आवळल्या. सुरुवातीलाच चकीत करण्याच्या बाबतीत तो निश्चितपणे चांगला खेळाडू आहे. भारतीय खेळाडूला लिरेनकडून निओ ग्रुनफेल्ड बचावाचा सामना करावा लागला आणि सातव्याच चालीत गुकेशला आश्चर्यकारक कल्पना सूचली. लिरेनने मागील दोन सामन्यांत त्याला ओपनिंगच्या बाबतीत भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्यासारखे वाटत होते, पण मंगळवारी त्याची बाजू पडती राहून पांढऱ्या सोंगाट्यांचे पारडे भारी राहिले.
लिरेननेही नंतर मान्य केले की, तो पराभूत होता होता बचावला. ‘मला वाटले होते की, माझी स्थिती निराशाजनक आहे. सुऊवातीच्या आणि मधल्या खेळांत माझ्यावर अनेकदा मात करण्यात आलेली आहे. पण येथे युक्ती गवसल्याने मला खूप आनंद झाला. मी अनेक चुका केल्या, पण सुदैवाने मी सामना वाचविला, असे लिरेन म्हणाला.









