उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
देशात भांडवल गुंतवणूकदारांसाठी कर्नाटक अत्यंत प्रशस्त ठिकाण आहे. राज्यात गुंतवणूकदारस्नेही वातावरण असल्याने गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली.
भारत-अमेरिका यांच्यामधील गुंतवणूकदारविषयक आयोजित व्हर्च्युअल सभेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. कोरोनानंतरच्या काळात उद्योग, गुंतवणूक, आविष्कार आदी क्षेत्रांमध्ये भारताने झेप घेतली आहे. कोरोना महामारीतही संपूर्ण जगात पूर्वपदावर येणारा भारताने पहिला देश ठरला आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकही गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असणारे राज्य आहे. गुंतवणूकदारांसाठी राज्य सरकार सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात उद्योग व भांडवल गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), भारतीय तांत्रिक संस्था (आयआयटी) आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) या सारख्या अत्युत्तम शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे उत्तम कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची राज्यात कमतरता नाही. आविष्कारातही कर्नाटक देशात आघाडीवर आहे. निती आयोगाच्या आविष्कार मानांकनात कर्नाटक 2019 आणि 2020 या वर्षांत कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती आणि विकास, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेम्स ऍण्ड कॉमिक्स क्षेत्रातही कर्नाटकाची घोडदौड सुरू आहे. संशोधन आणि विकासातही कर्नाटकाचा वाटा महत्त्वाचा आहे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.









