अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
संगोळ्ळी रायण्णा पुतळा स्थापन करण्यावरुन पिरनवाडी येथे वाद निर्माण झाला होता. हा वाद एका गावातील होता. गावातील समस्या गावातच सोडविण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे यांनी दिली.
पिरनवाडी येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरकुमार पांडे बेळगावात आले आहेत. शनिवारी पिरनवाडी व नंदगड येथे भेट देवून बेळगावला परतल्यानंतर दुपारी तरुण भारतने त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. ही समस्या संपली असली तरी तेथील बंदोबस्त आणखी काही दिवस कायम असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पुतळा स्थापनेवरुन गैरसमजुती निर्माण झाल्या होत्या. चर्चेच्या माध्यमातून त्या दूर करण्यात आल्या आहेत. सध्या गावात शांतता आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे, मिरवणुकांवर बंदी असताना मोर्चा काढणाऱयांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी एकूण तीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पिरनवाडीसह बेळगावात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम रहावी, शांतता रहावी यासाठी बेंगळूरहून आपण येथे आलो आहोत. एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी पिरनवाडी येथेच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण गावातील समस्या गावकऱयांच्या चर्चेतून सुटली तर ताणतणाव निर्माण होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. गावकऱयांच्या पुढाकारातूनच या वादावर तोडगा काढण्यात आल्याचे अमरकुमार पांडे यांनी सांगितले.









