वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील खेळाडूंचा संयुक्त संघ बनविला असून ज्यांचा खेळ पाहणे आवडेल, अशाच खेळाडूंना त्यांनी या संघात स्थान दिले आहे. या संयुक्त संघात पाकचा माजी क्रिकेटपटू हनिफ मोहम्मद आणि भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना सलामीची जोडी म्हणून त्यांनी पसंती दिली आहे.
सुनील गावसकर यांनी पाकचा माजी कर्णधार रमीझ राजा यांच्यासमवेत सोनी टेन वाहिनीवरील एका कार्यक्रमात भारत-पाक संयुक्त संघाची निवड करून या संघाचा खेळ पाहणे आवडेल, असे सांगितले. गावसकर यांनी या संयुक्त संघातील अकरा खेळाडूंची निवड केली. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडू व्यतिरिक्त त्रिशतक झळकविणारे हनिफ मोहम्मद हे पहिले फलंदाज म्हणून ओळखले जातात. या संघामध्ये पाकचे माजी फलंदाज झहीर अब्बास यांना तिसरे स्थान, सचिन तेंडुलकरला चौथे, गुंडाप्पा विश्वनाथला पाचवे तर भारताचा माजी कर्णधार कपिलदेवला सहावे स्थान दिले आहे. या संयुक्त संघामध्ये इम्रान खान सातव्या तर सय्यद किरमाणी आठव्या, वासीम अक्रम नवव्या, अब्दुल कादीर दहाव्या आणि भागवत चंद्रशेखर अकराव्या स्थानासाठी निवडण्यात आले.
गावसकर यांनी निवडलेला भारत-पाक संयुक्त इलेव्हन- हनिफ मोहम्मद, वीरेंद्र सेहवाग, झहीर अब्बास, सचिन तेंडुलकर, गुंडाप्पा विश्वनाथ, कपिलदेव, इम्रान खान, किरमाणी, वासीम अक्रम, अब्दुल कादीर आणि बी.एस. चंद्रशेखर.









