मनपाच्या कारवाईला स्थगिती देण्याची गाळेधारकांनी केली होती मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ताब्यात घेऊन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेऊन बेकायदेशीर गाळे रिकामी करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी अंतरिम अर्जाद्वारे केली होती. मात्र न्यायालयाने सदर मागणी फेटाळली आहे.
महापालिकेने यापूर्वी महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर दिले होते. पण सदर गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच विविध ठिकाणी असलेल्या गाळय़ांची देखील मुदत संपली असल्याने सर्व गाळे रिकामी करून ताब्यात घेतले आहेत. तसेच भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महात्मा फुले भाजीमार्केटमधील गाळे रिकामी करून ताब्यात घेण्यात आले. तसेच या ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याने भाजी मार्केटचे प्रवेशद्वार सीलबंद करण्यात आले. मात्र याला आक्षेप घेऊन गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. तसेच न्यायालयात धाव घेऊन गाळे रिकामी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.
महापालिकेने पूर्वसूचना न देता गाळे रिकामी करून बेकायदेशीररित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या दुकाने रिकामी करण्याच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी अंतरिम अर्जाद्वारे केली होती. याबाबत वादी प्रतिवादींचे म्हणणे जाणून घेऊन न्यायालयाने अंतरिम अर्जाची सुनावणी केली आहे. गाळेधारकांनी अंतरिम अर्जाद्वारे केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली असून दुकाने रिकामी करण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच गाळय़ांच्या कराराबाबत देखील गाळेधारकांनी याचिका दाखल केली आहे. पण गाळे रिकामी करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळाली नसल्याने याचिकेचा निकाल गाळेधारकांच्या बाजूने लागणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









