ऑनलाईन टीम / गाझियाबाद :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. तरी देखील काही जण या नियमाचे उल्लंघन करून फिरताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून उत्तर प्रदेशात गाजियाबादमध्ये अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने अजब शक्कल लढवली आहे.
कोरोनाच्या काळात कोणी घरी पाहुण्यांना बोलावले तर संबंधितांवर 11 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल तसेच वेळप्रसंगी वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निर्णयावरून रहिवासी व संघटनेत जुंपली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दंडाची रक्कम न भरल्यास पाणी आणि वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल आणि दंडाची रक्कम पी एम केअर मध्ये जमा केली जाईल. सोसायटी सतत लोकांना आवाहन करीत आहे की कोणीही बाहेरच्या व्यक्तीला सोसायटी मध्ये आणू नका. जर कोणाला कोरोना ची बाधा झाली तर संपूर्ण सोसायटी सील केली जाईल.









