उचगांव / वार्ताहर
बेकायदेशीर दारु वाहतुक करणा-या अनिल राजकुमार मनचुंडिया (वय ३४ वर्षे, रा. टेलिफोन भवनजवळ, गांधीनगर) याला गांधीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे दोन लाख एकसष्ठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबतची पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील गोशाळा परिसरातील मोकळ्या जागेत बेकायदेशीर दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. यावेळी अनिल मनचुंडिया हा मोटार क्रमांक एम एच ०९ सी एम ६९६६ मधून दारु घेऊन आला होता. पोलीसांनी मोटारीची तपासणी केली असता मोटारीमधून वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी दारु सापडली. पोलीसांनी मोटारीसह दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी गांधिनगर पोलीसांनी मनचुंडिया याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सपोनि दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, पोलीस नाईक मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख आदींनी सहभाग घेतला.









