उचगाव /वार्ताहर
तावडे हॉटेल ते गांधीनगर या मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूला असणाऱ्या छोट्या, मोठ्या टपऱ्या आज सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या. परंतु मजबूत असणारी अतिक्रमणे पोलीस बंदोबस्त नसल्याच्या कारणावरुन काढली नाहीत.
आज सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने येथील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेल्या छोट्या, मोठ्या टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकल्या. दुकानासमोरील फरशी, पायरी, टपऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे बांधकामांवर कारवाई केली नसून लवकरच या बांधकामांवर कारवाई करणार आहे. या कारवाईवेळी गर्दी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पी. एल. नंदीवाले, वैभव जाधव, वैभव कुंभार, श्रीकांत सुतार, संजय माळी, वसंत पिले, किरण मगदूम, राजाराम वळकुळे आदिंनी सहभाग घेतला.









