प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण ठिकठिकाणी लागलेल्या जलवाहिन्यांच्या गळती निवारणाचे व व्हॉल्व्हच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदाशिवनगर परिसरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविली आहे. या भागाकडे जाणाऱया रस्त्यावर क्लबरोड शेजारी असलेल्य व्हॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील रस्त्याचीदेखील दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तसेच क्लबरोड शेजारी वाहणारे पाणी वाहनाद्वारे पादचारी आणि दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर उडत असते. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
तसेच राजेंद्र प्रसाद चौक ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंतच्या खडेबाजार मुख्य रस्त्यावर चार ठिकाणी जलवाहिनीद्वारे पाणी वाया जात आहे. अशा प्रकारे विविध भागात वॉल्व्हच्या गळतीद्वारे पाणी वाहून जात असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे जलवाहिन्या आणि वॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.









