पळसावडेच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांचे कृत्य,
प्रतिनिधी/ सातारा
वनविभागाचे प्राणी गणनेचे काम करण्यासाठी पळसावडे येथे वनविभागाच्या हद्दीत वनरक्षक सिंधू सानप व त्यांचे पती सुर्याजी ठोंबरे हे गेले होते. त्यावेळी त्यांना मला न सांगता काम कसे करता अशी विचारणा करत थेट वन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रामचंद्र जानकर याने व त्याच्या पत्नीने गर्भवती असलेल्या सिंधू सानप यांना व त्यांच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले असून रामचंद्र जानकर याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यास अटक करण्यात आलेली नव्हती.
सातारा तालुक्यातील पळसावडे येथे वनविभागात प्राणी गणनेचे काम करण्यासाठी बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वनरक्षक सिंधू सानप व त्यांचे पती सुर्याजी ठोंबरे हे गेले होते. त्यावेळी वन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर व त्याची पत्नी प्रतिभा ही तेथे आली. त्यांनी आम्हाला न विचारता तुम्ही काम कसे सुरु केले असे विचारत थेट सिंधू सानप यांना मारहाण करु लागले. त्यांनी सिंधू सानप यांनी खाली ढकलून देवून त्यांच्या पोटात लाथा मारल्या. त्यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. मारहाण करणारा रामचंद्र जानकर हा एवढा क्रूर बनला होता. त्यामध्ये त्याची पत्नी प्रतिभा ही त्याला साथ देत होती. दोघे अगदी वनविभागाच्या पतीपत्नींना मारत होते. त्यात दोघेही जखमी झाले असून जानकर याच्यापासून सुटका करुन जखमी अवस्थेत वनरक्षक दाम्पत्याने सातारा तालुका पोलीस ठाणे गाठले अन् जानकर याच्यावर गुन्हा दाखल केला.. त्यास अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.
जानकर याची अनेक प्रकरणे
जानकर याच्या दहशतीमुळे सरकारी कर्मचारी काम करण्यास धजावतात. त्याने यापूवींही सरकारी कर्मचाऱयांना गावात मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. रामचंद्र जानकर हा गावगुंड असून त्याने गावातील अनेकांना मारहाण केल्याने त्याच्या विरोधात कोणीही बोलत नाही. त्याच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर दहशत केली जाते. अलिकडे तो त्याच्या पत्नी आणि मुलींना पुढे करत असल्याची जोरदार चर्चा पळसावडे परिसरात सुरु होती.








