हॉकर्स-नॉन हॉकर्सबाबत फेरविचार करणे गरजेचे
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर आणि उपनगरात फेरीवाल्यांची मनमानी आणि रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी याचा विचार करून महापालिकेने हॉकर्स आणि नॉन हॉकर्स झोनची घोषणा केली आहे. मात्र, बाजारपेठेत होणाऱया गर्दीबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, रामदेव गल्ली, मारुती गल्ली अशा अरुंद गल्ल्यांमध्ये फेरीवाले रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे राहण्याची शक्मयता आहे.
शहरात फेरीवाले आणि भाजी विपेत्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱया अडचणी सोडविण्याऐवजी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची योजना केंद्र शासनाने राबविली आहे. पण फेरीवाल्यांचे पुनर्वसन करताना वाहतुकीस अडचण होणार नाही याचा विचार करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या खुल्या जागेत किंवा वाहतुकीस अडचण होणार नाही अशा ठिकाणी फेरीवाला झोनची घोषणा करण्याची सूचना शासनाने केली आहे. पण महानगरपालिकेने हॉकर्स-नॉन हॉकर्स झोनची घोषणा करून केवळ आपली जबाबदारी पूर्ण केल्याचा कांगावा केला असल्याचे निदर्शनास आले आहे. हॉकर्स आणि नॉन हॉकर्स झोनची घोषणा करताना कोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, कोणते रस्ते अरुंद आहेत याचा सारासार विचार केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱया रस्त्यांवर फेरीवाल्यांना बंदी घालण्याऐवजी परवानगी देण्यात आली आहे.
हॉकर्स-नॉन हॉकर्स झोनची घोषणा करताना केवळ प्रमुख मार्गांवरील रहदारी कोंडी टाळण्यासाठी फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱया परिसरातील रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी नियमावली तयार करणे गरजेचे आहे. कोणताही सण आला की शहरातील प्रत्येक रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी होते. गणपत गल्लीसारख्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी फेरीवाले हातगाडय़ा लावून ठाण मांडतात. शहरातील भू-भाडे वसुली करणारा कंत्राटदार बदलला की फेरीवाल्यांच्या जागा वाढतात. ज्या ठिकाणी फेरीवाले थांबत नाहीत अशा ठिकाणीदेखील हातगाडय़ा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली आणि रामदेव गल्ली, मारुती गल्ली अशा विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने फेरीवाल्यांना थांबण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. मात्र, सध्या शहरातील सर्वच रस्त्यांवर फेरीवाले आणि भाजी विपेते गर्दी करत आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात तसेच कडोलकर गल्लीच्या प्रवेशद्वारासह रामदेव गल्ली, मारुती गल्लीतील मंदिर समोरच्या कोपऱयावर फेरीवाले ठाण मांडून वाहतूक कोंडीत भर घालीत आहेत. किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, शनिवार खुट अशा विविध भागात फेरीवाले रस्त्यावर थांबत असल्याने रहदारीस अडचणी निर्माण होत आहेत. मात्र या अडचणींचा हॉकर्स-नॉन हॉकर्स झोनची घोषणा करताना विचार करण्यात आला नसल्याची टीका नागरिक करीत आहे. त्यामुळे हॉकर्स-नॉन हॉकर्सची अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. फेरीवाल्यांसाठी नियमावली घालणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त करण्यात येत आहेत.









