ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा निर्णय आज घेण्यात आला. कोरोनाविरूद्धच्या लढय़ासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
याबाबत सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे देशातील गरिबांना तत्काळ मदत व्हावी, यासाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करत आहोत. हे पैसे थेट नागरिकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. यामध्ये जनधन खाते असलेल्या वीस कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तसेच आठ कोटी तीस लाख कुटुंबांना ‘उज्वल गॅस योजने’अंतर्गत पुढील तीन महिने मोफत गॅस मिळणार आहे. तसेच 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळेल. सध्या मिळत असल्याच्या अतिरिक्त हा पुरवठा मिळेल. यासोबतच एक किलो डाळही मोफत मिळणार आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना 50 लाखांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच शेतकऱयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आठ कोटी 70 लाख शेतकऱयांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.